गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर आंबोली पोलिसांची धडक कारवाई; 10.07 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक, तिघे फरार
सावंतवाडी | शहर वार्ताहर : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीविरोधात आंबोली पोलिसांनी रविवारी मध्यरात्री धडक कारवाई केली. गोवा ते सोलापूर दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो मॅक्स टेम्पोसह दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 2 लाख 6 हजार रुपये किमतीचा दारूसाठा आणि 8 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 10 लाख 7 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांची नावे नितीन संजय धनवडे (27) आणि सचिन विजय वाकडे (25) अशी असून, दोघेही दामाजी नगर, धरणगाव रोड बायपास, मंगळवेढा, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. या प्रकरणातील त्यांचे तीन साथीदार टोयाटो रुमियन कारसह पसार झाले. याप्रकरणी पाचही जणांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास बांदा-संकेश्वर मार्गावरील आंबोली चेकपोस्टच्या मागील रस्त्यावरून दोन वाहने संशयास्पदरीत्या वेगाने जात असल्याचे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रामदास जाधव आणि पोलीस नाईक गौरव परब यांच्या मदतीने वाहनांचा पाठलाग केला. आंबोली बाजारवाडी येथे महिंद्रा बोलेरो मॅक्स टेम्पो अडवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विनापरवाना गोवा बनावटीची दारू आढळून आली.
दरम्यान, दारूची वाहतूक करणारा टेम्पो सुरक्षितपणे पुढे जावा यासाठी त्याच्या पुढे टोयाटो रुमियन कार चालवली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला; मात्र चालकाने कार न थांबवता वेगाने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत कारमधील तिघे पसार झाले.
पोलिसांनी टेम्पोतील दोघांना ताब्यात घेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार संशयित आणि टोयाटो रुमियन कारचा शोध सुरू आहे.
ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे, रामदास जाधव आणि पोलीस नाईक गौरव परब यांनी केली.