ओढ्यावरील रेणुकादेवीची आज आंबिला यात्रा
पहाटे चार वाजता देवीची आरती
दुपारी तसेच रात्री साजरा होणार पालखी सोहळा
देवीला अर्पण नैवेद्याचे भाविकांना होणार वाटप
नेते मंडळींकडून उभारल्या स्वागत कमानी
पाळणे, खेळणींच्या स्टॉलनी सजरा यल्लमाचा ओढा परिसर
कोल्हापूर
यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबिल यात्रा शनिवार 21 रोजी रेणुका (यल्लमा) देवस्थान वतीने साजरी करण्यात येत आहे. पहाटे चार वाजता रेणुकादेवीला अभिषेक करून तिची महापूजा बांधून आंबिल यात्रेला सुरूवात करण्यात येईल. यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या लाखावर भाविकांना डोळ्यासमोर ठेवून रेणुकादेवी मंदिरासमोरील रस्त्यावर पाचशे फूट लांबीचा कापडी दर्शन मंडप उभारला आहे. या मंडपात महिला व पुरूषासांठी स्वतंत्र दर्शन रांग तयार केली आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळीकडून भाविकांचे स्वागत करणाऱ्या कमानीही उभारल्या आहेत. या कमानींमधून नेतेमंडळींची एकप्रकारची ईर्ष्या दिसून येत आहे.
भाविकांकडून देवीला अर्पण केला जाणारा नैवेद्य पहाटेच्या सुमारास रेणुकादेवीची आरती झाल्यानंतर स्वीकारण्यास सुरूवात केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता रेणुकादेवीची पहिला पालखी सोहळा साजरा करण्यात येईल. फुलांनी सजवलेल्या पालखीत रेणुकादेवीचा मोठा टाक असणार आहे. पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर रेणुका मंदिराला पालखी प्रदक्षिणा घालेल. तसेच रात्री नऊ वाजता देवीचा दुसरा पालखी सोहळा होईल. या सोहळ्यातही पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आंबिल यात्रेची सांगता केली जाईल. यानंतर रेणुकादेवीचे मानाचे चारही जग आपआपल्या स्थानांकडे रवाना होतील.
दरम्यान, दिवसभर भाविकांकडून दिला जाणारा प्रत्येक नैवेद्य हा इतर भाविकांना रेणुकादेवीचा प्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे. त्यासाठी मंदिराचे पुजारी, जोगती यांच्यासह रेणुका मंदिर यात्रा समितीचे कार्यकर्ते सक्रीय राहणार आहेत. समितीकडून मिळणाऱ्या प्रसादाचा चांगल्या पद्धतीने भाविकांना लाभ घेता यावा यासाठी रेणुका देवस्थानने रेणुका मंदिराच्या मागील जागेत व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. दुसरीकडे भाविकांसाठी एक विरंगुळा म्हणून रेणुका मंदिरासमोरील जागेसह शाहू दयानंद हायस्कूलजवळील मोकळ्या जागेत उंच उंच पाळणे उभारले आहे. अनेक पाळणे हे पंचवीस ते चाळीस फूट उंचीचे आहे. तसेच रेणुकादेवी मंदिरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यासह विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉलही उभारले आहेत.
रेणुकादेवीचे जग रेणुका मंदिरात दाखल.
सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीच्या यात्रेसाठी 7 डिसेंबरला कोल्हापुरातून गेलेले मानाचे चार जग शुक्रवारी रात्री रेणुकादेवी मंदिरात दाखल झाले. रेणुका देवस्थान व रेणुका मंदिर यात्रा समितीने जगांचे स्वागत केले. यानंतर मंदिराच्या पिछाडीस उभारलेल्या कापडी मंडपात जगांना विराजमान केले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रात्री भाविकांची झुंबड उडाली होती. शनिवारी पहाटेपासून पुन्हा जगांचेही दर्शन घडवून आणले जाणार आहे.