ओढ्यावरच्या रेणुकादेवीची अंबिल यात्रा शनिवारी
कोल्हापूर प्रतिनिधी
ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबिल यात्रा येत्या शनिवारी 6 जानेवारीला होणार आहे. श्री रेणुका (यल्लमा) देवस्थानच्या वतीने या यात्रेचे परंपरेनुसार आयोजन केले आहे. सौदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा झाल्यानंतर कोल्हापूरच्या ओढ्यावरील रेणुकादेवीची अंबिल यात्रा होत असते. यंदा शनिवारी 6 जानेवारीला अंबिल यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्र कमिटीचे विजय पाटील, उमेश यादव, निलेश चव्हाण आणि मंदिराचे जोगती पुजारी मदनआई शांताबाई जाधव यांनी केले आहे.
कमिटीच्या वतीने यात्रेची तयारी करण्यात आली आहे. महिला आणि पुरूष भाविकांसाठी स्वतंत्र अशा भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था मंदिरात केली आहे. भाविकांकडून देवीला येणाऱ्या नैवेद्याची नासाडी टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून यात्रा कमिटीने स्वयंसेवकांचे नियोजन केले आहे. ते यंदाच्या यात्रेतही मदतीसाठी असणार आहेत.
स्वागताचे फलक झळकले
दरम्यान, अंबिल यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे फलक ओढ्यावरील पुलाबरोबर परिसरातील मार्गावर झळकले आहेत. यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर राजकीय नेत्यांचे स्वागत फलक लक्षवेधी ठरले आहेत.
देवीचा मान नैवेद्याचा
अन्न वाया जाते, त्यामुळे कोरडा शिधा नैवेद्य म्हणून देण्यात यावा, अशी सूचना काही भक्त करत आहे. पण अंबिल यात्रा ही केवळ देवीला नैवेद्य देणे एवढाच माफक हेतू नाही तर येणारे भाविक, भक्त सहभोजनाचा आनंद लुटतात, नैवेद्यातील पदार्थ हे हिवाळच्या ऋतुरासाठी पोषक असतात. नैवेद्याच्या नासाडी होऊ नये, यासाठी यात्रा कमिटीने स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. त्यांना सहकार्य करून पारंपरिक पद्धतीने अंबिल यात्रा साजारी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने एका पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.