For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जातीव्यवस्था संपविण्यासाठी अंबिगेर चौडय्यांचे विचार मार्गदर्शक

10:44 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जातीव्यवस्था संपविण्यासाठी अंबिगेर चौडय्यांचे विचार मार्गदर्शक
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : शोभायात्रेसह जयंती उत्साहात

Advertisement

बेळगाव : अंबिगेर चौडय्या हा समाज शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकरीत्या विकसित होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला पाहिजे. कोळी समाजाच्या मागणीनुसार अनुसूचित जाती-जमातीच्या यादीत या समाजाचा समावेश करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. कोळी समाज, जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवारी सरदार्स हायस्कूल मैदानावर झालेल्या अंबिगेर चौडय्या जयंती उत्सव कार्यक्रमात बोलताना सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, इतक्या मोठ्या प्रमाणात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद आहे. अंबिगेर चौडय्या हे संत, स्पष्ट वक्ते होते. त्यांनी समाजात बदल घडविण्यासाठी प्रयत्न केले. जातीव्यवस्था संपविण्यासाठी त्यांचे विचार महत्त्वाचे ठरतात. त्यांची शिकवण जीवनात अनुसरण्याची गरज आहे. कोळी, बेस्त, कब्बलिग, अंबिग आदी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या समाजाचा अनुसूचित जाती-जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, बाराव्या शतकात म. बसवेश्वरांनी जातीव्यवस्था संपविण्यासाठी समानतेचा मार्ग दाखविला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दमनीतांच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहेत. अंबिगेर चौडय्या यांची शिकवण समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा दूर करून उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वाची ठरते. आमदार राजू सेठ यांच्या अध्यक्षतेखालाल कार्यक्रमात विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिलीप कुरुंदवाडे, विधान परिषद सदस्य रविकुमार, अंबिगेर चौडय्या नरसीपूर पीठाचे स्वामीजी, खासदार इराण्णा कडाडी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री आदींसह मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाआधी किल्ला तलावापासून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत विविध कला पथकांनी भाग घेतला होता. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते शोभायात्रेला चालना देण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, सिद्दगोंडा सुणगार, आप्पासाहेब पुजारी, संजय पाटील यांच्यासह विविध समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.