आंबेरी-वाकवाडी येथे नदीत होडी उलटली; शोधमोहीमेनंतर एकाचा मृतदेह सापडला

चौके (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी सासरवाडी आंबेरी-वाकवाडी येथे आलेल्या कुटुंबावर गुरुवारी सकाळी दुर्दैवी प्रसंग ओढवला. नदीपलीकडे शेतीच्या कामासाठी होडीतून जात असताना होडी नदीपात्रात बुडाल्याने चौघेजण पाण्यात पडले. यातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर दर्शन चंद्रकांत टकारिया (रा. गुजरात, सध्या मुंबई) यांचा बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास ही घटना घडली. होडी नदीत बुडाल्यानंतर चौघेजण पाण्यात पडले. यावेळी होडी चालविणारे स्वप्नील संदीप वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत दोघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र दर्शन टकारिया हे नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाले.
घटनेनंतर त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली. तसेच स्कुबा डायव्हिंग पथकाच्या मदतीने युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. अखेर दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडून आला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडल्याने आंबेरी-वाकवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.