शिरोड्यात 7 कोटीचे अंबरग्रीस जप्त ; चार संशयित ताब्यात
वन विभागाची बनावट ग्राहक बनून मोठी कारवाई : ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस ताब्यात
वेंगुर्ले / प्रतिनिधी
शिरोडा परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या 'अंबरग्रीस'ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाने ही मोठी कारवाई १६ एप्रिल रोजी सायंकाळी करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे तब्बल ७ कोटी रुपये आहे. या प्रकरणी चार जणांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
शिरोडा परिसरामध्ये वन्यप्राणी ब्लू व्हेल (अनुसुची १) प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायदेशीर रित्या जवळ बाळगून त्याची विक्री करणार असल्याचे सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी) यांना समजले. त्यांनी गुरुवारी सायंकाळी मिलीश शर्मा (उपवनसंरक्षक सावंतवाडी), संजय वाघमोडे (विभागीय वनअधिकारी दक्षता कोल्हापूर), डॉ. सुनिल लाड (सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून तसेच काही टिम तयार केल्या. वनक्षेत्रपाल फिरते पथक व वनपरिक्षेत्र कुडाळ मधील स्टाफ समवेत बनावट ग्राहक तयार करून सापळा रचण्यात आला.त्यानुसार सायंकाळी सात च्या सुमारास वन्यप्राणी ब्लू व्हेलची उलटी बेकायदेशीर रित्या बाळगल्या प्रकरणी वनगुन्ह्याची कारवाई करून शिरोडा-परबगाव येथील रणजित रामचंद्र नायर, (वय ४० वर्षे, रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७० वर्षे रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर (वय ३५ वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला) आणि निलेश मनोहर पांडजी (वय ३३ वर्षे, रा. रेडी. ता. वेंगुर्ला) यांना संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली आहे. संशयितांकडून ९.१२० कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आलेल आहे. सदरचे अंबरग्रीस आरोपी १ ते ४ यांना सुमारे ७ कोटी रुपये किंमतीस विक्री करावयाची होती. ब्लू व्हेल माशाची उलटीस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी मागणी व किंमत असल्याने पैशांच्या लोभापायी अशा स्वरूपाचे वनगुन्हे सध्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अंबरग्रीस अथवा वन्यप्राण्याचे मृगयाचिन्ह, उपपदार्थ आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ लगतचे वनाधिकारी यांना कळविण्यात यावे असे आवाहन वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी यांनी केले आहे.सदरची कारवाई सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक), अमित कटके (वनक्षेत्रपाल संशोधन दोडामार्ग), शसावळा कांबळे (वनपाल मठ), महेश पाटील (वनपाल फिरते पथक) ब्रम्हकुमार भोजने (वनरक्षक तुळस), संग्राम पाटील (वनरक्षक आंबोली), अनिकेत माने (वनरक्षक माणगाव), रविंद्र पाटील (वनरक्षक फिरते पथक) रिषीका होले (वनरक्षक फिरते पथक), नितीन सावंत (चालक वनविभाग) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.