तळेबाजार येथे ८ कोटीचे अंबरग्रीस जप्त
सावंतवाडी वनविभागाची कारवाई: देवगडातील तीन संशयित ताब्यात
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी केलेल्या कारवाईत ८ किलो ८०० ग्रॅम वजनाची सुमारे ८ कोटी रूपये किंमतीची ब्लू व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली असून याप्रकरणी देवगडमधील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. योगेश गणपत करंजेकर (४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (३३, रा. आनंदवाडी), संतोष काशिराम नाडणकर (५६, रा. वरेरी) अशी संशयिताची नावे आहे. ही कारवाई ३० एप्रिल रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे ब्लू व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी अज्ञात इसम येणार असल्याची गुप्त माहिती उपवनसंरक्षक सावंतवाडी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक खा. कु. तो., वन्यजीव सावंतवाडी, वनक्षेत्रपाल कणकवली व अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत बनावट ग्राहक तयार करून अंबरग्रीस खरेदी करण्यासाठी तळेबाजार येथे पाठविण्यात आले. सदर तीन संशयित अ ज्ञात इसम हे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करण्यासाठी आले असता वन विभागाच्या पथकाने त्यांना सापळा रचून मुद्देमालासह रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी योगेश करंजेकर, विष्णू धुरत, संतोष नाडणकर या तीनही संशयितांवर देवगड राऊंड गुन्हा क्र. डब्ल्यू एल 01/2026 नुसार वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४९, ४९ (बी), ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांकडून ८ किलो ८०० ग्रॅम वजनाची अंदाजे ८ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) हस्तगत करण्यात आलेली आहे. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक वनसंरक्षक तथा (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी डॉ. एस. के. लाड यांच्या नेतृत्वाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील, मठ वनपाल सावळा कांबळे, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, पोलीस हवालदार गौरेश राणे, मिठबाव वनरक्षक आप्पासो राठोड, ठाकुरवाडी वनरक्षक रामदास घुगे, दिगवळे वनरक्षक प्रतिराज शिंदे, सागर भोजने, संग्राम पाटील, अनिल गावडे, मंदार नाईक (चालक) यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याबाबत अन्य काही माहिती असल्यास सावंतवाडी वनविभाग यांना देण्यात यावी. सदर व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन वन विभागाने केले आहे.