For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचसीए क्रिकेट ऑपरेशन्स संचालकपदी अंबाती रायुडू

06:04 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
एचसीए क्रिकेट ऑपरेशन्स संचालकपदी अंबाती रायुडू
Advertisement

वृत्तसंस्था, हैदराबाद

Advertisement

भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूची हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) क्रिकेट ऑपरेशन्स संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही घोषणा सोमवारी करण्यात आली. एचसीए आपल्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आणि या प्रदेशातील क्रिकेटच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असतानाच ही नियुक्ती झाली आहे. रायुडूचा तीन वर्षांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावाने सुरू झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गौरवशाली कारकीर्द गाजवलेल्या आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या रायुडूची हैदराबादमधील क्रिकेटचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा दांडगा अनुभव आणि आधुनिक क्रिकेटच्या गरजांची असलेली सखोल समज, यामुळे रायुडूच्या नियुक्तीमुळे एचसीएच्या कामकाजात एक नवा दृष्टिकोन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनात, रायुडूने आपल्या या नव्या भूमिकेबद्दलचा उत्साह व्यक्त केला आहे. मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, न्यायमूर्ती पी. नवीन राव (एसएमसी), एम. जीवन रे•ाr (सचिव एचसीए) आणि अपेक्स कौन्सिल यांच्याद्वारे माझी एचसीएच्या क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही गोष्टींमधील त्रुटी दूर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. परंतु हैदराबाद आणि तेलंगणामधील अफाट क्रिकेट प्रतिभेला बहरताना पाहण्यासाठी आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणारे अधिक खेळाडू घडवण्यासाठी मी अधिकच उत्सुक आहे, असे रायुडूने लिहिले आहे.

रायुडूची ही नवी भूमिका एका अशा प्रकरणाचा समारोप करेल, जे 2019 मध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. त्यावेळी रायुडूने एचसीएमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी एचसीएमधील निर्णयांमुळे संघाच्या निवडीमध्ये राजकारण शिरले आहे, असे रायुडूने म्हटले होते. त्या घटनेनंतर रायुडूने 2019-20 च्या हंगामात हैदराबाद सोडले आणि आंध्र व बडोदा संघांकडून खेळत आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीची सांगता केली.

रायुडूने आपल्या कारकिर्दीत 55 एकदिवशीय सामने, 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 97 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त सहा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) विजेतेपदे पटकाविले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांसाठी प्रत्येकी तीन विजेतेपदांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायुडूने 2023 आणि 2024 मध्ये सीपीएल (कॅरिबियन प्रीमियर लीग) आणि आयएलटी-20 या लीगमध्येही सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :

.