For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजदूतांकडून शुल्क हटविण्याची मागणी

06:50 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजदूतांकडून शुल्क हटविण्याची मागणी
Advertisement

भारतासंबंधी ट्रंप यांच्या साहाय्यक नेत्याचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

भारताच्या राजदूतांनी आमच्याकडे अमेरिकेने भारतावर लागू केलेले व्यापार शुल्क हटविण्याची मागणी केली होती, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक सहकारी आणि सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी केले आहे. आम्ही रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची आयात पुष्कळच कमी केली आहे. आता अमेरिकेने आमच्यावर लागू केलेले 25 टक्के अतिरिक्त व्यापार शुल्क हटवावे. तुम्ही आमची ही मागणी अध्यक्ष ट्रंप यांच्यापर्यंत पोहचवावी, असे भारताच्या अमेरिकेतील राजदूतांनी आपल्याकडे स्पष्ट केल्याची माहिती ग्रॅहॅम यांनी दिली.

Advertisement

अमेरिकेच्या अध्यक्षांचे विमान एअरफोर्स वन मधून ट्रंप यांच्या समवेत प्रवास करताना त्यांनी भारताविषयी काही विधाने केली आहेत. गेल्या महिन्यात मी भारताच्या राजदूतांच्या निवासस्थानी गेलो होतो. भारताने रशियाकडून होणारी तेलाची आयात पूर्णपणे थांबवावी, अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे मी स्पष्ट केले होते. यावर, भारताच्या राजदूतांनी तेल आयात बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे, अशी माहिती दिली. तसेच अमेरिकेने भारतावर लागू केलेले दंडात्मक 25 टक्के व्यापारशुल्क काढून घ्यावे, असेही प्रतिपादन राजदूतांनी केले, असे ग्रॅहॅम यांचे म्हणणे होते. त्यांच्या या म्हणण्यावर भारताने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारत-अमेरिका व्यापार चर्चा

भारत आणि अमेरिका यांच्यात गेले 10 महिने व्यापारविषयक चर्चा होत आहे. दोन्ही देश एकमेकांशी व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. तथापि, भारताने आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेच्या कृषी मालासाठी मोकळी करण्यास नकार दिला आहे. भारताने कृषी बाजारपेठ खुली करावी, असा दबाव अमेरिकेकडून येत आहे. तथापि, भारताने आतापर्यंत हा दबाव स्वीकारलेला नाही. भारताने आपल्या निर्यातीसाठी पर्यायी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा शोधण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेच्या व्यापार शुल्कानंतरही भारताच्या जागतिक निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले असून अमेरिकेलाही भारताची निर्यात वाढली असल्याचे दिसून येते.

अमेरिकेच्या नाराजीची भारताला माहिती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, हे आम्हाला आवडलेले नाही, हे त्यांना माहीत आहे. तसेच भविष्यकाळात ही तेलखरेदी पूर्णपणे थांबली नाही, तर भारतावरील व्यापार शुल्कात आणखी वाढ केली जाईल, याचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाण आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या फोर्स वन या विमानात पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरुन व्यापार करारासंबंधात चर्चा केली होती. त्यानंतर ट्रंप यांनी हे विधान केलेले आहे. भारताने आता रशियाकडून होणारी तेलाची आयात पुष्कळशी कमी केली आहे. तरीही अमेरिकेने व्यापार शुल्काचे प्रमाण कमी पेलेले नाही. भारताने रशियाकडून होणारी तेलाची खरेदी पूर्ण थांबवावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र, आमच्या 140 कोटी जनतेची ऊर्जा सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही तेलाच्या आयातीचे धोरण ठरवित आहोत, अशी भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात खंड पडला नसला, तरी दोन्ही देशांमध्ये या संदर्भात तणाव मात्र निश्चितच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.