आंबडपाल शाळेची बाह्य मूल्यमापनात उत्कृष्ट कामगिरी
राज्यस्तरावर प्राप्त केली 'अ +' श्रेणी
कुडाळ-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( पुणे ) यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा' अंतर्गत बाह्य मूल्यमापनात कुडाळ तालुक्यातील आंबडपाल जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर 'अ+' (A+) श्रेणी प्राप्त केली. या यशाबद्दल जिल्ह्यातून शाळेचे कौतुक होत आहे.शासनाच्यावतीने शाळांचा शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी हे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये आंबडपाल जि.प.प्राथमिक शाळेने राबविलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग या जोरावर या शाळेने हे मानांकन मिळविले. राज्यातील मोजक्याच शाळांना हा बहुमान मिळाला असून, त्यात आंबडपाल शाळेने आपले स्थान निश्चित केले आहे, अशी माहिती संजय बगळे यांनी दिली.या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि पालकांना देण्यात येत आहे. या शाळेच्या या गौरवशाली कामगिरीमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खासगी शाळांच्या तोडीचा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.शाळेच्या या यशाबद्दल परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले असून भविष्यातही अशीच गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा विश्वास शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
गुणवत्ता आणि नाविन्याचा ध्यास
शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अवांतर उपक्रमांतही आपली मोहोर उमटविली आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलविलेली 'केळीची बाग' हे श्रमसंस्काराचे उत्तम उदाहरण ठरत आहे. 'स्वच्छ शाळा, सुंदर शाळा' आणि 'गुणवत्तापूर्ण शाळा' हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता ती शाळेची ओळख बनली आहे.गुणवत्ता आणि नाविन्याचा ध्यास घेऊन या शाळेची वाटचाल सुरू आहे.मूल्यमापनाच्या प्रक्रियेत शाळेचे भौतिक वातावरण, मुलांची शैक्षणिक प्रगती आणि शाळा व्यवस्थापनाचा सक्रिय सहभाग या सर्व निकषांवर शाळा सरस ठरली,असे श्री बगळे यांनी सांगितले.