राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेत आंबडपाल प्रा. शाळा तृतीय
कुडाळ -
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.या यशाने या शाळेने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शाळेला गौरविण्यात आले. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम सन 2023-2024 अंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि त्यात आंबडपालच्या या शाळेने यश मिळविले. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे. ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे. यासारखे हेतू या उपक्रमामुळे साध्य झाले. प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांक प्राप्त एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पात्र ठरली होती.त्यासाठी या राज्य स्पर्धेसाठी या जिल्ह्यातून आंबडपाल च्या या शाळेची निवड करण्यात आली होती. मुंबई शहर सोडून सर्व 35 जिल्हयातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परिक्षण होऊन ही शाळा राज्यात तृतीय क्रमांकासाठी पात्र ठरली. सदर शाळांचा विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( पुणे ) येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रधान सचिव आय. ए. कुंदन , सहसचिव अर्चना अवस्थी , प्रकल्प संचालिका आर. विमला , आयुक्त सूरज मांढरे , संचालक राहुल रेखावार , मा . आय टी विभाग प्रमुख योगेश सोनवणे यांच्या उपस्थितित 21 हजार रू.चा धनादेश , शिल्ड व प्रमाणपत्र देऊन दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात आले या प्रसंगी आंबड्पालचे सरपंच महेश मेस्त्री, कृषी व शिक्षण तज्ज्ञ तानाजी सावंत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश तानिवडे , महेश नाईक व शाळेचे मुख्याध्यापक संजय बगळे यांनी सदर सत्कार व पारितोषिक स्विकारले.