For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | कोल्हापुरात आज अंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव! रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने होणार प्रारंभ

12:33 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापुरात आज अंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव  रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामीने होणार प्रारंभ
Advertisement

                        कोल्हापुरात अंबाबाई रथोत्सवाची धूम;

Advertisement

कोल्हापूर : वाडीरत्नागिरीवरील चैत्रयात्रेच्यानिमित्ताने जोतिबारायासमोर लिन झालेल्या भाविकांना गुरुवार २ रोजी रात्री कोल्हापुरात आयोजित रथोत्सवातून करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होता येणार आहे. पारंपरिक थाटात निघणाऱ्या रथोत्सवाला रात्री साडे नऊ वाजता आरंभ होईल. तत्पूर्वी मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ रथाला तोफेची सलामी दिली जाईल. आणि या सलामीनंतरच अंबाबाईच्या रथाला हाताने ओढत नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करण्यात येईल.

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ रथोत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या सागवानी लाकडाच्या रथाला फुले आणि विद्युत रोषणाई सजवण्यात येईल. सायंकाळी सात वाजता रथामध्ये अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान करुन तिची रथातच अलंकार पूजाही केली जाईल.

रात्री साडेनऊ वाजता रथाला तोफेची सलामी दिल्यानंतर नगरप्रदक्षिणेला आरंभ होईल. यानंतर रथाची नगरप्रदक्षिणा महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडा, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड आदी मार्गावरुनअंबाबाईच्या रथाच्या स्वागतासाठी भाविकांकडून संपूर्ण नगरप्रदक्षिणा मार्गात मोठमोठ्या रांगोळ्या घालण्यात येणार आहेत. फुलांचे गालिचेही बनवले जाणार आहेत. त्यामुळे दुपारी एकनंतर महाद्वार रोडसह संपूर्ण रथोत्सव मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

रथाला मध्यरात्री अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ नेऊन त्यातील उत्सवमूर्तीला सोन्याचा पालखीत विराजमान केली जाईल. यानंतर देवीचा पालखी सोहळ्याला सुरुवात केली जाईल. पालखीने अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणाही घातली जाईल. प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलेच राहणार आहे.

न्यू गुजरी मित्र मंडळाकडून अंबाबाईच्या रथाचे गुजरी कॉर्नर येथे मोठ्या दिमाखात स्वागत केले जाणार आहे. स्वागतासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील निमंत्रित केलेले रांगोळी कलाकार भब्य अशी संस्कार भारती रांगोळी घालणार आहेत.

Advertisement
Tags :

.