अंबाबाईच्या 1008 नावांच्या स्मरणाने गरजला मंदिर परिसर
कोल्हापूर
हे अंबामाते सदैव तुझी कृपा आम्हावरी राहू दे, अशी मनोकामना व्यक्त करत रविवारी सकाळी अंबाबाई मंदिराजवळ सौख्यदायी महाकुंकुमार्चन सामुदायिक उपासना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामधील सहभागी सहा हजारांहून अधिक सुवासिनींनी अंबाबाईच्या पादुकांवर कुंकु अर्पण करत देवीच्या 1008 नावांचे स्मरण केले. सलग अडीच तास हा नामस्मरणाचा महिमा सुरु होता. सर्व सुवासिनींनी खांद्याला खांदा लावून केलेल्या नामस्मरणाने सारा अंबाबाई मंदिर परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात कोल्हापूरसह सांगली, मिरज, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, बीड, बेळगाव, हैद्राबाद येथील सुवासिनी सहभागी होत्या. करण्यात आलेल्या आवाहनानुसार सुवासिनींनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आयोजित महाकुंकुमार्चन सामुदायिक उपासनेसाठी अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ आकर्षक मंडप उभारला होता. मंडपात अंबाबाईच्या मूर्ती, श्रीयंत्रासह छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे विराजमान केले होते. त्यांना मेवेकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन कुंकमार्चन सोहळ्याला सुरुवात केली. या सोहळ्याची पार्श्वभूमी सांगतांना ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी म्हणाले, अंबाबाई मंदिरात देवीच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करुन 300 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्यावर 2015 साली कुंकुमार्चन विधी आयोजनला प्रारंभ केला. जातींच्या भींती झुगारुन देत समाजातील सुवासिनींना सोहळ्यात मानाने स्थान देतो आहे. गेल्या वर्षी पाच हजारावर सुवासिनी कुंकुमार्चनाचा विधी केला होता. यंदाच्या वर्षी 6 हजार सुवासिनी सोहळ्यात सहभागी असल्याचे मेवेकरी म्हणाले.
दरम्यान, कुंकुमार्चनाचा विधी करण्यासाठी सुवासिनी पहाटे चार वाजल्यापासून गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करुन आणि साजश्रृंगाराने नटून अंबाबाई मंदिराकडे येत होत्या. सर्व जणींना भवानी मंडपमार्गे अंबाबाई मंदिर दक्षिण दरवाजा ते जुना राजवाडा परिसरात केलेल्या बैठक व्यवस्थेकडे सोडले. सर्व सुवासिनी स्थानापन्न झाल्यानंतर वेदमूर्ती सुहास जोशी यांनी कुंकुमार्चनाची माहिती सांगितली. आपले सौभाग्य अखंड रहावे, अक्षय्यलक्ष्मी प्राप्तीसह कार्यसिद्धीसाठी अंबाबाईचा आशिर्वाद मिळत राहू दे अशी भावना घेऊन कुंकुमार्चन केले जाते. कुंकवात शक्तीतत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. म्हणून कुंकुला शक्तीतत्वाचे दर्शक मानले. अंबाबाईच्या 1008 नावांचे स्मरण करत कुंकुमार्चन करणे हे फलदायी कार्य मानण्यात येते, असेही जोशी यांनी सांगितले. यानंतर सर्व सहा हजारांवर सुवासिनींनी प्रत्यक्ष कुंकुमार्चन विधीला सुरुवात केली. विधीसाठी सुवासिनींना महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टकडून पादुकासह श्रीफळ, पत्रावळी, दोन द्रोण, कुंकु असे विधी साहित्य दिले होते. सुवासिनींनी पादुकांना एका द्रोणात ठेवून त्यावर कुंकुं अर्पण करायला सुरुवात केली. देवमूर्ती सुहास जोशी व विशाल जोशी यांच्या सुरात आपला सुर मिसळून सुवासिनींनी अंबाबाईच्या 1008 नावांचे स्मरण करायला सुरुवात केली. अडीच तासानंतर नावांच्या स्मरणाची सांगता झाली. यानंतर सुवासिनींनी घरोघरी ऐश्वर्य नांदू दे...अशी मनोकामना व्यक्त केली. हा महाकुंकुमार्चन सोहळा यशस्वी करण्यासाठी कुंकमार्चन सोहळा संयोजन समितीचे प्रमुख अॅड. तन्मय मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, आदित्य मेवेकरी, विराज कुलकर्णी, प्रसाद जोशी, प्रतिक गुरव, रजत जोशी, चंद्रशेखर घोरपडे, सुनील जोशी,ऋतुराज सरनोबत यांच्यासह 100 कार्यकर्ते, कर्मचारी परीश्रम घेत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुवासिनींना भेटवस्तू...
कुंकुंमार्चनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर बक्षीसे मिळवून देणारी सोडत काढण्यात आली. यात भाग्यवान ठरलेल्या 48 सुवासिनींना 2 लाखांहून अधिक रक्कमेच्या आणि घरगुती वापरासाठी उपयोगी पडतील अशा वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही सर्व सुवासिनींना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आली.