Navratri 2025: अंबाबाई मंदिरात बॅग, पर्स, पिशवीला नो एंट्री, आरतीवेळी दर्शन रांग सुरु राहणार
सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी कामात बेजबाबदारपणा दाखवू नये
कोल्हापूर : नवरात्रोत्सव काळात रोज करण्यात येणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या पाचही आरतींवेळी मंदिराबाहेरून आतमध्ये आलेली भाविकांची दर्शन रांग थांबवली जाणार नाही. सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी कामात बेजबाबदारपणा दाखवू नये. ते आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
अभिषेक वेळेतच करण्यावर लक्ष केंद्रित करावे. मंदिर आवारातील ओवऱ्यांसह अन्य केबिनधारकांनी मंदिरात ठेवलेल्या पेढ्यांसह अन्य पदार्थांची फुड अॅण्ड ड्रग विभागाकडून तपासणी करवून घ्यावे, याची माहिती शनिवारी आयोजित बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी संबंधित घटकांना दिली.
मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी बॅग, कापडी पिशवी अथवा मोठी पर्ससह सोडू नये अशी सूचना केली. त्यामुळे जे कोणी सोबत बॅग, पर्स, पिशवी आणतील, त्यांना मंदिरात सोडले जाणार नाही. तेव्हा भाविकांनी सोबत पूजासाहित्याशिवाय बॅग, पर्स अथवा पिशवी आणू नये, असेही नाईकवाडे यांनी बैठकीत सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील अभिषेक मंडपात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अंबाबाई मंदिरातील पुजारी, देवस्थान समितीचे सुरक्षारक्षक, कर्मचारी, मंदिराच्या अंतरंगातील दुकानदार व नागरिक उपस्थित होते. दोन तास सुरु राहिलेल्या बैठकीत नाईकवाडे यांनी सर्वांच्या जबाबदाऱ्या पटवून सांगितल्या.
ते म्हणाले, अंबाबाईच्या दर्शनाला रोज किमान लाख ते दीड लाख भाविक येतात. त्यांना लवकरात लवकर दर्शन मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेअंतर्गतच दर्शन रांगेत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला 40 मिनिट ते एक तासाच्या कालावधीत अंबाबाईचे दर्शन मिळणार आहे.
सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांना सांगताना नाईकवाडे म्हणाले की, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी सर्वांनी सौजन्याने वागावे. त्यांना अपमानजनक वाटेल, अथवा गैरसोय होईल, असे कोणीही वर्तन कऊ नये. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
मंदिर भोवतीसह पालखी मार्गातील अतिक्रमण हटवा
अंबाबाई मंदिराभोवती आणि संपूर्ण पालखी मार्गात ठिकठिकाणी अतिक्रमण दिसून येत आहे. ही अतिक्रमणे अंबाबाई व तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना नक्कीच अडथळा करत राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभिर्याने पाहून सर्व प्रकारची अतिक्रमण हटवण्यासाठी धडक मोहिम हाती घ्यावी, असे नाईकवाडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले.
तिसऱ्या डोळ्याची यंत्रणा सज्ज
देवस्थान समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी तिसऱ्या डोळ्याची व्यवस्था उभी केली आहे. अंबाबाई मंदिर आवारात सतत होत राहणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी 120 पीटीझेड आणि आयपी कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. तसेच 15 जण वॉकी टॉकीसह मंदिर व आवारात तैनात राहणार आहे. मंदिराच्या वरील बाजूने सतत टेहळणी करण्यासाठी 1 ड्रोन कॅमेराही सक्रिय असणार आहे, असे अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.
अकरा ठिकाणी उभारणार एलईडी स्क्रीन
अंबाबाईच्या पूजांसह रोज रात्रीच्या तसेच ललिता पंचमी व शाही दसऱ्या दिवशी साजरा केला जाणाऱ्या देवीच्या पालखी सोहळ्याचे लाईव्ह दर्शन भाविकांना घडवले जाणार आहे. त्यासाठी 11 ठिकाणी मोठ्या आकाराची एलईडी स्क्रीन उभारण्यात येत आहेत.