For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ambabai Temple Kolhapur: पहिल्याच माळेला मंदिरात गर्दी, 1 लाखावर भाविकांनी घेतले दर्शन

12:54 PM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
ambabai temple kolhapur  पहिल्याच माळेला मंदिरात गर्दी  1 लाखावर भाविकांनी घेतले दर्शन
Advertisement

सोहळ्यासाठी देवीच्या सोन्याच्या पालखीला कलश रुपात फुलांनी सजवले होते

Advertisement

कोल्हापूर : दिवसभरात दोन्हीही पूजांचे 1 लाख 18 हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले. यामध्ये स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून परजिह्यातीलही हजारो भाविकांनी देवींचे दर्शन घेतले. पूर्व दरवाजामधून अंबाबाई मंदिराच्या आतामध्ये येत राहिलेल्या दर्शन रांगेइतकीच मंदिरातील कासव चौकातून अंबाबाईचे मुख दर्शन घेण्यासाठी  भाविकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटे आणि सकाळच्या सत्रात येत राहिलेल्या महाराष्ट्रातील विविध जिह्यांमधील हजारो भाविकांच्या गर्दीने अंबाबाई व तुळजा भवानी मंदिर परिसर हाऊसफुल्ल झाला होता. या गर्दीतील अनेक भाविकांकडून सकाळी 6 ते 8 या वेळेत वेदा सोनुले-झुरळे यांनी उपस्थित भाविकांकडून ललित सहस्त्रनाम व जगदीश गुळवणी यांनी श्री सुक्त पठण करवून घेतले.

Advertisement

त्यानंतर मंदिरातील अभिषेक मंडपात उभारलेल्या रंगमंचावर दिवसभरात उचगाव येथील माऊली महिला भजनी मंडळ, सांगली येथीलगजानन महाराज महिला भजनी मंडळ, कोल्हापुरातील विठ्ठलपंथी महिला भजनी मंडळ, इचलकरंजीतील श्रीदत्त महिला भाऊड भजनी मंडळ, उजळाईवाडीतील साई महिला भजनी मंडळ, चिंचवड (पुणे) येथील दत्त प्रासादिक महिला भजनी मंडळ व हनुमान सेवा भजनाने देवदेवतांचा जागर करणारी भजने सादर केली.

तसेच भजनांमधून कलाकारांनी देवदेवतांची रुपेही भाविकांना दाखवत त्यांची महती सांगितली. रात्री अंबाबाई मंदिरातील मानकऱ्यांनी ‘अंबा माता की जय’ असा जयघोष करत देवीच्या उत्सवमूर्तीच्या पालखीला खांद्यावर घेऊन अंबाबाई मंदिर प्रदक्षिणेला सुरुवात केली. पालखीतील देवीच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर आवारात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

प्रदक्षिणेसाठी एक एक पावलांनी पालखी पुढे पुढे होत राहिली तशी पालखीवर अनेक भाविकांनी फुलांची उधळण केली. पालखी प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यत परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हजारोंच्या उपस्थितीत पालखी सोहळा रात्री साडेनऊ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाईचा पालखी सोहळा अभूतपुर्व उत्साहात साजरा झाला.

या सोहळ्यासाठी देवीच्या सोन्याच्या पालखीला कलश रुपात फुलांनी सजवले होते. आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी अलोट गर्दी झाल्याने ढकलाढकली झाली. यामध्ये गुदमरल्याने दोन भाविक बेशुद्ध पडले.

Advertisement
Tags :

.