Navratri 2025: नवरात्रीची घाई सुरु, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात स्वच्छतेला सुरुवात
22 तारखेला घटस्थापना झाल्यावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होणार
कोल्हापूर : देवस्थान समितीच्या कर्मचारी आणि मुंबईच्या आय स्मार्ट फॅसिटेक प्रा.लि. कंपनीकडून शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर व परिसर स्वच्छतेला सुरू करण्यात आली. 22 तारखेला घटस्थापना झाल्यावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होणार आहे.
त्यामुळे बुधवारपासून अंबाबाई मंदिराची स्वच्छता करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये देवस्थान समितीचे काही कर्मचारी आणि आय स्मार्टच्या जवळपास 20 ते 25 कर्मचाऱ्यांकडून दरवर्षीप्रमाणे ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. देवस्थान समितीचे 10 कर्मचारी आणि बीव्हीजी ग्रुप यांचे चार, नारायणी लेबर सर्व्हिस यांचे 10 असे 25 कर्मचारी कायमस्वरूपी स्वच्छतेसाठी तैनात आहेत.
पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील कचरा आणि झाडाझुडपं काढून परिसर स्वच्छ केला जाणार आहे. दीपमाळा आणि शिखराला रंग दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यात आधुनिक साधनांनी मंदिराचा आतला आणि बाहेरचा भाग स्वच्छ केला जाईल. त्यानंतर विद्युत रोषणाईची तयारी सुरू होईल.
नवरात्रकाळात प्रथेनुसार एकादशीला देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करून दागिन्यांचा तेजस्वीपणा वाढवला जातो. यंदाही ही परंपरा कायम ठेवली जाणार आहे. 17 तारखेला गाभाऱ्यातील देवीचे दागिने आणि पालखी स्वच्छ करून त्यांची झळाळी वाढवली जाईल. पालखीचीही साफसफाई केली जाणार आहे.
साधरणत: 21 तारखेला ही तयारी पूर्ण झालेली असेल. हवामान विभागाने ऑक्टोंबरपर्यंत पाऊस असल्याचे वर्तण्यात आल्याने मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची पावसामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पत्र्याचा मंडप उभारण्यात येणार आहे.
प्रशासनाचे सूचनांचे पालन करा
जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समिती यांनी दिलेल्या सुचनेचे पालन मंदिरात येणाऱ्या भाविकांनी करावे असेही आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे योग्यरित्या पालन करून सहकार्य करावे. तसेच उत्सव काळात मंदिराच्या बाहेरील बाजूस व्यवस्थापन करण्यासाठी व्हाईट आर्मी, अनिरुध्द बापू यांच्या संस्थेची मदत घेणार असल्याचे महादेव दिंडे यांनी सांगितले.
भाविकांची आरोग्यविषयक काळजी घेण्यात येणार
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची आरोग्यविषयक काळजीही मंदिर व्यवस्थापन प्रशासनाने घेतली आहे. भाविकाला आरोग्यविषयक काही तक्रार असली तर त्याला प्रथमोचार देण्याची व्यवस्थाही केली आहे.
प्लास्टिकचा वापर टाळावा
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्लास्टिक पिशव्या आणण्याचे टाळावे असे आवाहन देखील व्यवस्थापनाकडून करण्यात आल्याची माहिती महादेव दिंडे यांनी दिली.