Navratri 2025 Ambabai Temple: पालखीवेळी रात्री 9 नंतर अंबाबाई मंदिरात प्रवेश बंद
पालखी होईपर्यंत भाविकांना उत्तर आणि पश्चिम दरवाजाजवळ थांबविण्यात येणार आहे
कोल्हापूर : नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी असते. रात्री पालखीच्या वेळी यामध्ये अधिक भर पडते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने मंदिरात रात्री 9 नंतर येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालखी होईपर्यंत भाविकांना उत्तर आणि पश्चिम दरवाजाजवळ थांबविण्यात येणार आहे.
पालखी पुढे सरकल्यानंतर टप्प्पाटप्प्याने भाविकांना मुखदर्शन सुरु करण्यात येणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई देवीच्या पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक येत असतात. यावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. यातच गरुड मंडपाचे काम सुरु असल्यामुळे गरुड मंडपातील मुख दर्शनाची रांग बंद ठेवली आहे.
यामुळे पालखी सोहळ्यावेळी काही भाविक दर्शनापासून वंचित राहत आहेत. पालखीनंतर केवळ एक तासाचा अवधी दर्शनासाठी राहतो. यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने पालखी निघण्यावेळी म्हणजेच ९ बाजण्याच्या सुमारास भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर टप्प्याटप्याने भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे
"मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने यंदा काही बदल केले आहेत. पालखी सुरु होण्यापूर्वी काही वेळ मंदिरात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार आहे. यामुळे एकाचवेळी मंदिरात येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. याचवेळी पूर्व दरवाजातून सुरु असणारी दर्शन रांग सुरुच राहणार आहे."
- डॉ. धीरजकुमार बच्चू अपर पोलीस अधीक्षक