Cultural Kolhapur : प्रसाद अंबाबाईचा, मोफत आणि परिपूर्ण प्रसादाचा लाभ
गेली पंधरा वर्षे झाली, महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने हे अन्नछत्र चालू
कोल्हापूर : एरवी नवरात्र सोहळ्यात जी गर्दी व्हायची तेवढी गर्दी आता रोज होत आहे. नवरात्रात तर गर्दीचा महापूर होणार हे ठरलेलेच आहे. आणि या सर्व भाविकांना अन्नछत्रात पोटभर प्रसाद देण्याची जबाबदारी महालक्ष्मी अन्नछत्राने घेतली आहे. आज पंधरा वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम सुरु आहे आणि भाविकांकडून कोणताही एक पैसा न घेता, हेही आगळेवेगळे वैशिष्ट्या म्हणावे लागेल.
कोल्हापुरात यायचे अंबाबाईचे दर्शन घ्यायचे आणि महालक्ष्मी अन्नछत्रात जाऊन चार घास खायचे, हे आता जणू कोल्हापुरात ठरूनच गेले आहे. गेली पंधरा वर्षे झाली, महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने हे अन्नछत्र चालू आहे. अन्नछत्रात रोज चार ते पाच हजार लोक लाभ घेणार त्यामुळे घाईघाईत आणि काहीही, कसाही प्रसाद असला प्रकार येथे कधीच घडलेला नाही.
या प्रसादाची रासायनिक तपासणी करून घेतली जात आहे आता या सर्व रासायनिक कसोट्यांना उतरणारे पदार्थच महालक्ष्मी अन्नछत्रात असणार हे निश्चित झाले आहे. प्रसादासाठी एक रुपया नव्हे तर एक पैसाही प्रसादाच्या ताटावर भाविकांकडून घेतला जात नाही. हे तर येथे उपलब्ध करुन देत असलेल्या प्रसादाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्या ठरले आहे .
कोल्हापूरची अंबाबाई हे देशभरातल्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अलीकडच्या काळात रस्ते वाहनांची उपलब्धता यामुळे भाविकांच्या संख्येत रोज वाढ आहे. भाविकांची संख्या हजाराच्या संख्येत आहे. एरवी नवरात्र सोहळ्यात जी गर्दी व्हायची तेवढी गर्दी आता रोज होत आहे.
नवरात्रात तर गर्दीचा महापूर होणार हे ठरलेलेच आहे. आणि या सर्व भाविकांना अन्नछत्रात पोटभर प्रसाद देण्याची जबाबदारी महालक्ष्मी अन्नछत्राने घेतली आहे. आज पंधरा वर्षे झाली कोणतीही अडचण येऊ दे अन्नछत्रात अन्न शिजले नाही असे कधीच झालेले नाही.
हे अन्नछत्र महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने चालवले जाते. शासकीय देवस्थान समितीकडे मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. आणि महालक्ष्मी भक्त मंडळ या भक्तांच्या समूहाने अन्नछत्राची जबाबदारी स्वीकारली आहे. या अन्नछत्राची सुरुवात अवघ्या 50 ते 60 अशा भाविकांसाठी झाली.
कारण रोज इतक्या भाविकांसाठी अन्न शिजवायचे ते वाढायचे हे प्रॅक्टिकली शक्यच नव्हते. आणखी एक कारण असे की प्रसाद म्हटल्यावर भाविकश्रद्धेने रोज रांगच्या रांग लागून उभे राहायचे. प्रसाद संपला म्हटले की नाराज व्हायचे.
तत्पूर्वी महालक्ष्मी भक्त मंडळामार्फत फक्त धर्मशाळा चालवली जात होती. किमान 200 भाविकांची अतिशय अल्प दरात राहण्याची आंघोळ पाण्याची सोय केली जायची. धर्मशाळा मंदिराच्या अगदी जवळ. त्यामुळे ही धर्मशाळा कायम भाविकांच्या गर्दीने गजबजलेली असते .
भक्तमंडळाने 15 वर्षांपूर्वी अन्नछत्र चालू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने कपिलतीर्थ मंडईतील आपला हॉल अन्नछत्रासाठी अल्प मोबदल्यात भाड्याने दिला. आणि अन्नछत्राची पहिली पंगत या ठिकाणी पंधरा वर्षांपूर्वी बसली. आज पंधरा वर्षे झाली आहेत त्याच ठिकाणी अन्नछत्र चालू आहे. रोज तीन ते चार हजार भाविक त्याचा लाभ घेत आहेत. नवरात्राच्या काळात तर आठ ते दहा हजार भाविक रोज त्याचा लाभ घेत आहेत. आणि कोल्हापूर ...अंबाबाई दर्शन ....आणि त्यानंतर प्रसाद हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे वेगळे वैशिष्ट्या ठरले आहे .
पोटभर प्रसाद..
"अंबाबाईला येणारा प्रत्येक भाविक आता अन्नछत्राचा लाभ घेतो. एकावेळी सातशे लोकांची पंगत असते. समाजातील सर्व घटक मांडीला मांडीला लावून प्रसादासाठी श्रद्धेने बसतात. पोटभर प्रसाद घेतात आणि तृप्त होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानच आम्हा महालक्ष्मी भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना रोज वेगळे बळ देते."
- राजू जाधव, मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट
21 घटकांचा मसाला...
खीर, भात, भाजी, आमटी व ताक हेच प्रसादातील पदार्थ दररोज असतात. भाविकांना पोटभर प्रसाद दिला जातो. तो कांदा लसूण विरहित असतो. आणि आरोग्याचा भाग म्हणून जो मसाला वापरला जातो तो 21 घटकांचे मिश्रण केलेला असतो. त्यामुळे तो आरोग्य व पचनासाठी ही उपयोगी पडतो.
इट राईट.....
या अन्नछत्रात प्रसाद वाटप रोज आहे .पण वाटला जाणारा प्रसाद स्वच्छता त्यातील पदार्थांचा दर्जा या बाजूने किती चांगला आहे यासाठी अन्न व औषध विभागाकडून वेळोवेळी या प्रसादाची छाननी करून घेतली जाते. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने ‘इट राईट’ असे या प्रसादाला प्रमाणपत्र दिले आहे.
कोल्हापूरकरांची मदत
मोफत अन्नछत्र म्हणून कोल्हापुरातले अनेक जण या अन्नछत्राचा लाभ घेत असतील असे अनेकांना वाटते. पण अतिशोयोक्ती नाही. कोल्हापुरातला एकही माणूस या अन्नछत्राचा लाभ घेत नाही. या प्रसादाचा लाभ परगावातून, परराज्यातून येणाऱ्या भाविकांनाच प्राधान्याने मिळावा, म्हणून कोल्हापुरातील लोक या अन्नछत्रात जात नाहीत. उलट आपल्याकडून जमेल तेवढी मदत करून हे अन्नछत्र कायम चालू राहील यासाठी प्रयत्न करतात.