Cultural Kolhapur: अंबाबाई मंदिरातील मातु:लिंग मंदिर, श्रावण सोमवारी दर्शनाची पर्वणी
या दिवशी हे मंदिर भक्तांसाठी दिवसभर खुले असते
By : सौरभ मुजुमदार
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई, आदिशक्ती आदिमाया, जगद्जननी जिच्या प्रत्यक्ष वास्तव्याने करवीर नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. साक्षात जगदंबा शिवलिंगसमान वैशिष्ट्यापूर्ण अशा पवित्र पाषाणावर गर्भगृहात उभी आहे. तिच्या मस्तकावरदेखील शिवलिंग आहे, असे वर्णन प्राचीन ग्रंथात आढळते.
या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्या म्हणजे देवीच्या गर्भगृहाच्या बरोबर डोक्यावर आणखीन एक मंदिर असून त्याच्यामध्ये असणाऱ्या शिवलिंगाची नित्यपूजा केली जाते. जे शिवलिंग देवीच्या मूर्तीच्या वरच्या स्थानावर असून ज्याला सर्वोच्च शक्ती स्थानाचे प्रतीक मातु:लिंग म्हणून ओळखले जाते.
पूर्वी वर्षभर खुले असणारे हे मंदिर सुरक्षिततेच्या कारणास्तव निवडक सण, उत्सव अशा प्रसंगी भक्तांसाठी खुले केले जाते. त्यातीलच एक मौल्यवान दिवस म्हणजे श्रावण मासातील सोमवार होय. या दिवशी हे मंदिर भक्तांसाठी दिवसभर खुले असते. श्री महाकाली मंदिराच्या समोरून एक दगडी जिना या मंदिराकडे वर जातो. हेच मातु:लिंग अथवा मातृ:लिंग मंदिर म्हणून ओळखले जाते.
आत प्रवेश केल्यावर उंच दगडी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती असून मुख्य गर्भगृहात प्रवेश केल्यावर उत्तराभीमुखी चौकोनी आकाराचे वैशिष्ट्यापूर्ण असे शिवलिंग आहे. ज्याच्या पाठीमागे दगडी चौथ्यावर श्री गणेशाची मूर्ती आहे. देवीच्या मस्तकावर असणाऱ्या या शिवलिंगाला जगदंबेच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणेच वैशिष्ट्यापूर्ण असा प्रदक्षिणा मार्ग असून ज्यामध्ये संपूर्ण मंदिराचे वायूविजन नियंत्रण करण्यासाठी दगडी झरोके देखील पहावयास मिळतात.
आद्यशंकराचार्य गुरु गोविंद पादाचार्य व त्यांचे गुरू गौडपादाचार्य यांचा काळ साधारण चौथे ते पाचवे शतक असावा. यांचा सुभगोदयस्तुती या श्री यंत्रावरील उपासना ग्रंथात प्रकृती किंवा विश्वनिर्मितीच्या कारणाची शक्ती ही श्री शिव व शक्ती यांच्या एकारूपात श्री यंत्राच्या मध्यबिंदूस्थानावर रहाते, असे म्हटलेले आहे.
या वर्णनाप्रमाणेच श्री महालक्ष्मी मंदिरात सोळा काटकोनांचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याच मार्गाच्या मध्यबिंदूस्थानावर शिवलिंगासम पाषाणावर जगद्जननी गर्भगृहात उभी आहे. याच मूर्तीच्या मस्तकावर पुन्हा शिवलिंग आहे व पुन्हावरील मजल्यावर मातु:लिंग हे शिवलिंग आहे.
अशी वैशिष्ट्यापूर्ण रचना असणारे कदाचित हे एकमेव मंदिर असावे असे मंदिर अभ्यासकांचे मत आहे. कदाचित यामुळेच आजही देवीच्या पूजनामध्ये बेल पानांचा वापर केला जातो. मातु:लिंग मंदिरातील हे शिवलिंग हे मातृ देवतेचे व शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
म्हणजेच हे मातृत्वाचे अथवा स्त्रीलिंगाचे स्वरूप आहे. त्यामुळे केवळ याच शिवलिंगाला आजही अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. देवीच्या नित्य आरती सोबत या शिवलिंगाचीही दिवसातून चार वेळा आरती केली जाते. श्रावण मासातील सोमवारी सुरू असणाऱ्या या मंदिराच्या दर्शनासाठी आजही लाखो भाविक नतमस्तक होत असतात.