Ambabai Mandir: अंबाबाई मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, आराखड्यास 143 कोटींची मंजूरी
मंदिर परिसरातील भूसंपदानाची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या आराखड्याला मंगळवारी उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. स्ट्रक्चरल ऑडिट करुन मंदिराच्या जतन संवर्धनासह मूळ हेमाडपंथी बांधकाम पूर्ववत करणे, 64 योगिनींच्या मूर्ती, शिखर अशी कामे केली जाणार आहे.
पुढील टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुढील आठ दिवसात अहवाल देण्याचे बैठकीत ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस., देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी करण्यात आलेल्या 1364.77 कोटींच्या आराखड्याला मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. मंदिर परिसरातील भूसंपदानाची प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामास सुरूवात करताना मंदिरासाठी आवश्यक कामकाज सुरू करण्याचे ठरले.
मंदिराचा जो मूळ दगडी ढाच्या आहे, त्याचे जतन संवर्धन, मंदिराच्या शिखराची डागडुजी, सध्या असणरी गळती काढणे, फरशा, अंतर्गत विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, फरशा, ड्रेनेज सिस्टीम यासह 64 योगिनींसह वास्तूवरील सर्व शिल्पांचे जतन संवर्धनाची काम सुरू करण्याचे ठरले.
व्हिडीओ कॉन्फरन्सला मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, नगररचना विभागाचे विनय झगडे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतारही उपस्थित हाते. भूसंपादनासाठी लागणणार 929 कोटीअंबाबाई मंदिर विकास आराखडा 1364.77 कोटी ऊपयांचा आहे.
आराखड्याव्दारे मंदिर परिसराची सर्वंकष सुधारणा, जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि मजबुतीकरण, तसेच नव्या सुविधांचा समावेश आहे. तीन टप्प्यातील आराखड्यात भूसंपादनासाठी 929.23 कोटी तर बांधकामासाठी 435 कोटी 54 लाख खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पुनर्विकास प्रकल्पातील सुविधा
- दर्शनरांगेची सुधारणा
- पार्किंग सुविधा
- प्रमुख मार्गांचे बांधकाम
- इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
- माहिती केंद्र, स्वच्छतागृहे, आणि भाविकांसाठी विश्रामगृहे