Ambabai Temple Kolhapur : पारंपारिक ड्रेसकोड असणाऱ्यांनाच अंबाबाई, जोतिबा मंदिरात प्रवेश
तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करावेत
कोल्हापूर : सध्या उन्हाळा सुट्टीचे दिवस सुरु असल्याने कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. जोतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर, रंकाळा अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहेत. दरम्यान, आता स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आता योग्य असा ड्रेसकोड परिधान करावा लागणार आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करावेत, असे आवाहन देवस्थान समिती, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी उद्यापासून ड्रेसकोडचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.
देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. अंबाबाई, जोतिबा मंदिरात संपूर्ण राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. बऱ्याचवेळा भाविक पारंपारिक कपड्यांमध्ये नसतात किंवा तोकड्या कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे इथून पुढे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पारंपारिक कपडे परिधान करुन यावे, असे आवाहन यातून करण्यात आले आहे.
श्री करवीर निवासनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या मंदिराचे महत्व फार आहे. भाविक धार्मिक विधींसाठी पारंपरिक कपडे परिधान न करता तोकड्या कपड्यांवर येतात. त्यामुळे मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर व पालन करुन पारंपारिक वेशभूषेत महिला व पुरुष भक्तांनी येवून सहकार्य करावे, असे व्यवस्थापन समिनीतीने पत्रकाद्वारे कळवले आहे.