For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅमेझॉनची 100 शहरांमध्ये क्विक कॉमर्स सेवा होणार सुरु

06:57 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅमेझॉनची 100 शहरांमध्ये क्विक कॉमर्स सेवा होणार सुरु
Advertisement

जवळपास 1000 मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स करणार सुरु : 2800 कोटींची रक्कम खर्च करणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अॅमेझॉनने देशातील 100 शहरांमध्ये आपली क्विक कॉमर्स सेवा ‘अॅमेझॉन नाऊ’ सुरू करण्याची योजना आखली आहे. या बातमीनंतर मंगळवारी शेअर बाजारात इटर्नल (झोमॅटो) आणि स्विगीचे शेअर्स 3 टक्केपर्यंत घसरले. सध्या अॅमेझॉन नाऊ फक्त दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बंगळूरुमध्ये कार्यरत आहे

Advertisement

अॅमेझॉन इंडियाने गेल्या आठवड्यात 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, हा विस्तार त्याचाच एक भाग आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या विस्तारासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली जाईल. यासाठी 1000 हून अधिक मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्सचे जाळे तयार केले जाईल. ही छोटी गोदामे असतील, ज्यामुळे कमी वेळेत डिलिव्हरी सुनिश्चित होईल.

बाजारात इटर्नल, स्विगीचे शेअर्स घसरले

अॅमेझॉनच्या घोषणेचा परिणाम प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. एनएसईवर इटर्नलचे शेअर्स 3.47 टक्केनी घसरून दिवसभरातील नीचांकी पातळीवर 246.63 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, स्विगीचे शेअर्सही 2.78 टक्क्यांनी घसरून 278.25 रुपयांवर पोहोचले. तज्ञांच्या मते, अॅमेझॉनच्या आगमनामुळे विद्यमान कंपन्यांच्या वाढीवर आणि नफ्यावर दबाव वाढू शकतो.

16 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार

अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (दैनंदिन गरजेच्या वस्तू) हर्ष गोयल म्हणाले की, आम्ही आमच्या विस्तार योजनेला गती दिली आहे. आम्ही 1,000 हून अधिक मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्सच्या मदतीने 100 शहरांपर्यंत पोहोचू. ते म्हणाले की, या विस्तारामुळे 16,000 हून अधिक शेतकरी अॅमेझॉनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ताजा शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकणार आहेत, असेही कळते आहे.

 या शहरांमध्ये सेवा सुरू होणार

अॅमेझॉन नाऊ लवकरच पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, जयपूर, लखनौ, कानपूर, चंदीगड, अहमदाबाद, मेरठ, म्हैसूर, पानिपत, कोची, अमृतसर, मंगळूर आणि विशाखापट्टणम यांसारख्या शहरांमध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. तथापि, कंपनीने अद्याप निश्चित कालावधी ठरवलेला नाही.

इटर्नलचा नफा 191 कोटी अपेक्षित

इटर्नल आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. कंपनीचा नफा 191 कोटी रुपये अपेक्षित आहे, जो मागील तिमाहीत (तिमाही 3, आर्थिक वर्ष 2026) 102 कोटी रुपये होता. महसूल 17,155 कोटी होण्याचा अंदाज आहे.

क्विक कॉमर्स म्हणजे काय?

किराणा आणि जीवनावश्यक वस्तू 10 ते 30 मिनिटांत पोहोचवणाऱ्या मॉडेलला क्विक कॉमर्स म्हणतात. ब्लिंकइट, जेप्टो आणि स्विगी इंस्टाग्राममार्ट हे भारतातील याचे प्रमुख खेळाडू आहेत. अॅमेझॉनने याची सुरुवात प्राईम नाऊ म्हणून केली होती, ज्याचे नंतर रिब्रँडिंग करण्यात आले. आता ते किराणा आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करत आहे.

Advertisement
Tags :

.