अॅमेझॉनही आता क्वीक कॉमर्स क्षेत्रात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्वीक कॉमर्स क्षेत्राच्या वाढत्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी आता अॅमेझॉनही उतरली आहे. कंपनीने भारतात क्वीक कॉमर्सच्या क्षेत्रात उतरायचे ठरवले असून आगामी काळात जरुरीच्या वस्तु ग्राहकांना कंपनी 15 मिनीटे किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पोहोच करणार आहे. कंपनी आपल्या सेवेचा प्रारंभ बेंगळूरमधून करणार आहे.
ब्लिंकीट, झेप्टो व स्विगी इन्स्टामार्ट यांच्यासोबत आता अॅमेझॉनही स्पर्धेत उतरली आहे. लवकरात लवकर साहित्याचा पुरवठा करण्याच्या योजनेचा आराखडा करण्यात आला आहे. या नव्या सेवेचे नाव तेज ठेवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांची वस्तुंची मागणी पूर्ण करण्यासाठी साठवणुकीच्या केंद्रांचा शोध कंपनी घेत आहे. कंपनी डार्क स्टोअर्स स्थापणार असून कोणत्या शहरात किती डार्क स्टोअर्स सुरु करणार आहे याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही.
का अॅमेझॉन उतरणार
भारतात क्वीक कॉमर्सचे क्षेत्र विस्तारत असून ग्राहकांच्या बदलत्या वर्तणुकीवर अॅमेझॉनचे बारकाईने लक्ष आहे. मेटा यांच्या एका अहवालात 91 टक्के ग्राहकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म क्वीक कॉमर्सची माहिती असून त्यातले अर्धे या क्षेत्रातील कंपन्यांची सेवा वापरतही आहेत. किराणा सामान, वैयक्तिक काळजीची उत्पादने यांची मागणी क्वीक कॉमर्सद्वारे 57 टक्के जणांनी नोंदवली आहे, असेही अहवालात नमूद आहे.