अद्भुत रामभक्ती अयोध्येत
श्रीरामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून सारा भारत देश राममय झाला आहे. या भारलेल्या वातावरणाचे प्रत्यंतर ठायी ठायी येत आहे. असंख्य रामभक्त त्यांच्या त्यांच्या मार्गांनी आणि पद्धतींच्यानुसार रामभक्तीचे दर्शन घडवित आहेत. अनेक कलाकार त्यांच्या अंगभूत क्षमतेच्या माध्यमातून रामभक्ती साकार करीत आहेत. चित्रकूट येथील रामभक्त ईश्वरचंद्र सोनी हे त्यांच्यापैकीच आहेत.
सोनी हे व्यवसायाने सुवर्णकार आहेत. ते एका आभूषणांच्या व्यापार केंद्राचे संचालक आहेत. अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच्या स्थानी एक भव्य राममंदिर व्हावे ही त्यांची अनेक दशकांपासूनची इच्छा आहे. नुसती इच्छा आहे आहे असे नाही तर त्यांचा तसा ठाम विश्वासही होता. त्यामुळे 28 वर्षांपूर्वी त्यांनी रामनामाचे लेखन कलात्मक आणि अद्भुत पद्धतीने करण्याचा संकल्प सोडला होता. एका पोस्टकार्डावर त्यांनी प्रभू रामचंद्रांचे नाम लिहिण्यास प्रारंभ केला आणि या पोस्टकार्डावर त्यांनी 22 हजार 666 वेळा रामनाम लिहिले. इतकेच नव्हे, तर अयोध्येत भव्य राममंदिराच्या निर्माणकार्याचा शुभारंभ झाल्यानंतर काड्यापेटीतील एका काडीच्या गुलवर 251 वेळा रामनाम कोरले आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एका पोस्टकार्डावर 15 हजार 520 वेळा रामनाम लिहिले आहे. त्यांनी केलेली ही करामत साध्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यासाठी काचेच्या भिंगाचा उपयोग करावा लागतो. अनेकांनी भिंगाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य अनुभवले आहे.
आता ते या त्यांच्या कलाकृती श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माणकार्य न्यासाला अर्पण करणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते अयोध्येला जाणार असून भगवान रामलल्लांचे दर्शन करणार आहेत. त्यावेळी ते आपल्या या कलाकृती न्यासाच्या आधीन करणार आहेत. चित्रकूटच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या त्यांच्या रामसेवेसाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कारही केला होता. आता साऱ्या देशाला त्यांच्या या अद्भुत रामभक्तीचा परिचय झाला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकंदर, भगवान रामलल्लांमुळे देशात नवा उत्साह संचारला आहे.