For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महेश काळे यांच्या मैफलीचा अप्रतिम आविष्कार!

11:06 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
महेश काळे यांच्या मैफलीचा अप्रतिम आविष्कार
Advertisement

मर्कंटाईल सेवा संघ-मर्कंटाईल सोसायटीतर्फे आयोजन : प्रेक्षकांची तुडुंब गर्दी

Advertisement

बेळगाव : गायक व रसिक यांना सूर जेव्हा एकत्र बांधतात, तेव्हा एका अप्रतिम मैफलीचा  आविष्कार साकारतो. असाच आविष्कार महेश काळे यांच्या मैफलीने घडविला. गायकाने आपल्या स्वरवैभवाने रसिकांची मने जिंकत मैफल रंगवत नेली.  रसिकांनीही तितकीच उत्कट दाद देत या मैफलीला ‘चार चाँद’ लावले. मर्कंटाईल सेवा संघ व मर्कंटाईल सोसायटी आयोजित स्वरसंध्या अंतर्गत मंगळवारी सायंकाळी रामनाथ मंगल कार्यालयाच्या व्यासपीठावर महेश काळे यांचे गायन झाले. या गायनाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली. सभागृह पूर्ण भरून गेल्याने अनेक रसिकांना उभे राहावे लागले. तितकीच गर्दी बाहेरच्या खुल्या पटांगणावरही होती. या मैफलीचे उद्घाटन महेश काळे व केएलईच्या डॉ. प्रीती कोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. मर्कंटाईलचे चेअरमन संजय मोरे यांनी त्यांचे तसेच वादकांचे पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. आसावरी भोकरे यांनी मर्कंटाईलची माहिती देऊन सूत्रसंचालन केले.

यानंतर मैफलीला सुरुवात करताना महेश काळे यांनी ‘तदा रे दानी’ हा तराणा सादर केला. त्यानंतर ‘हरवा मोरा तुम्ही सोबर मा’ ही बंदीश सादर केली. ‘नाथ हा माझा’ या गीतानंतर गणेश जयंतीचे औचित्य साधून ‘हे गणराज ममराज’ हे भक्तिगीत सादर केले. यानंतर ‘सूर निरागस हो’, ‘शब्दावाचून कळले सारे’ ही गीते सादर केली. संभाजीनगर येथे नाथ या समाधीकडे जाताना सुचलेल्या चालीवर आधारित ‘अविरत नाथ निरंजन देवा’ हे पद त्यांनी सादर केले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘नारायण ते नमो’, ‘काटा रुते कुणाला’, ‘नाही पुण्याची मोजणी’, ‘पायोजी मैने राम रतन धन पायो’ या रचनांनंतर श्रोत्यांच्या फर्माइशीनुसार ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ ही रचना सादर केल्यानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ हे पद सादर करून मैफलीची सांगता केली. या पदाच्या शेवटी विठ्ठल नामाचा गजर करत त्यांनी श्रोत्यांनाही सहभागी करून घेतले. आणि या भक्तीरसात त्यांच्याबरोबरच श्रोतेही तल्लीन झाले. या मैफलीची सांगता होऊ नये, असेच प्रत्येक रसिकाला वाटले आणि हेच या मैफलीचे यश ठरले. पं. महेश काळे यांना तबल्यावर विभव खांडोळकर, संवादिनीवर राजीव तांबे, टाळ साथ अपूर्व द्रविड, पखवाज ॐकार दळवी, व्हायोलिनवर अपूर्व गोखले यांनी साथ केली. महेश काळे यांचे शिष्य प्रल्हाद जाधव व बेळगावची कन्या अंतरा कुलकर्णी यांनी स्वरसाथ केली.

Advertisement

‘गारवा’ कार्यक्रम आज

स्वरसंध्या अंतर्गत बुधवार दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘गारवा’ हा कार्यक्रम होणार आहे. गायक-संगीतकार मिलिंद इंगळे, कवि सौमित्र अर्थातच किशोर कदम व अभिनेत्री मधुरा गुजर यांचा यामध्ये सहभाग आहे. हा कार्यक्रमसुद्धा रसिकांना खुला आहे.

Advertisement
Tags :

.