मानवी चेहऱ्यांचे अद्भूत मासे
या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या सजीवांना निसर्गाने स्थान दिले आहे. कित्येक सजीवांची मानवाला माहितीही नसते. अशा माहिती नसलेल्या सजीवांशी जर कधी अनावधानाने किंवा अन्य काही कारणाने आपली गाठ पडली तर बराच गोंधळ उडण्याची शक्यता असते. आपल्या घरातील मत्स्यगृहात मासे पाळण्याचा छंद बऱ्याच जणांना असतो. त्यासाठी ते बराच पैसाही खर्च करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मास्यांचा शोध ते पाळण्यासाठी घेत असतात. ब्रिटनमधील लीडस् शहरात राहणाऱ्या माल्कम पॉसन यांना नुकताच असाच एक अनुभव आला आहे.
पॉसन यांना मासे पाळण्याचा छंद आहे. त्यांनी 3 वर्षांपूर्वी ‘कोई कार्प’ जातीच्या एका मास्याची खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी चक्क 16 हजार रुपये मोजले होते. त्यांनी मोठ्या प्रेमाने या मास्याचे नामकरण बॉब असे केले. त्यांनी या बॉबला आपल्या घरातील तलावात सोडले. या तलावात अन्य 11 प्रकारांचे मासेही होते. हे सर्व मासे त्यांच्या रंगपरिवर्तानासाठी प्रसिद्ध आहेत. कालांतराने ‘बॉब’चाही रंग पालटला आणि त्याच्या शरीरावरच्या डिझाईनमध्येही अनेक बदल झाले.
काही दिवसांनंतर या कोई कार्प जातीच्या बॉबच्या डोक्यावर मानवी डोळे, नाक आणि तोंडासारखे आकार उमटलेले पाहून पॉसन आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठे आश्चर्य वाटले. हा मासा आता अक्षरश: मानवी चेहऱ्याचा दिसू लागला होता. हा जणू त्यांना मोठा चमत्कारच वाटला. केवळ पॉसन यांनाच नव्हे, तर त्यांच्या मित्रपरिवारासाठीही हा मासा आता अत्यंत महत्वाचा बनला आहे. या प्रकारचे इतर मासे मात्र अशा मानवी चेहऱ्याचे होतातच असे नाही. त्यामुळे एक अत्यंत दुर्मिळ मासा आपल्या हाती लागण्याचे त्यांना समाधान आहे. या मत्स्याच्या ‘दर्शना’साठी आता अनेक लोक प्रतिदिन पॉसन यांच्या घरी येत असतात.