For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

29 जूनपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ

06:24 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
29 जूनपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ
Advertisement

उपराज्यपालांनी घेतला तयारीचा आढावा : यात्रामार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

52 दिवस चालणारी अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होणार आहे. यात्रेच्या प्रारंभापूर्वीच साधू-संत जम्मू येथे पोहोचू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मंगळवारी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बालटाल बेस कॅम्पचा दौरा केला. तसेच 100 बेड्सच्या रुग्णालयाचे त्यांनी उद्घाटन केले आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी भाविक आणि वाहनांवर नजर ठेवण्यासाठी जम्मू-श्रीनगर महामार्गावर हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Advertisement

वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी उधमपूर ते बनिहालपर्यंत 10 हाय-एंड कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचबरोबर वाहतूक पोलिसांनी अमरनाथ यात्रेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना एक सल्ला जारी केला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड ठोठावला जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

प्रशिक्षिक बचावपथके तैनात

जम्मूमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमुळे यात्रा मार्गावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही मार्गावर पोलिसांच्या 13, एसडीआरएफच्या 11, एनडीआरएफच्या 8, बीएसएफच्या 4 आणि सीआरपीएफच्या दोन पथकांना तैनात करण्यात आले आहे. तर श्राइन बोर्डाने वैद्यकीय व्यवस्थेत वाढ केली आहे. बालटाल आणि चंदनबाडीमध्ये प्रत्येकी 100 आयसीयू बेड, अत्याधुनिक उपकरणे, एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी मशीन, क्रिटिकल केयर तज्ञ, कार्डियक मॉनिटर, लिक्विड  ऑक्सिजन प्लॅन्टने युक्त दोन कॅम्प हॉस्पिटल्स स्थापन करण्यात आली आहेत. यात्रामार्गावर ऑक्सिजनचे प्रमाण  कमी असल्याने तेथे 100 स्थायी ऑक्सिजन बूथ आणि मोबाइल ऑक्सिजन बूथ असतील. पवित्र गुहा, शेषनाग पंचतरणीमध्ये तीन छोटी रुग्णालये असतील.

मार्गाचे रुंदीकरण

यात्रामार्गावर भोजन, वास्तव्य आणि आरोग्य तपासणीची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी पहलगामपासून गुहेपर्यंतचा 46 किलोमीटर लांबीचा मार्ग 3-4 फूट तर बालटालचा मार्ग 2 फूटच रुंद होता. आता हा मार्ग 14 फुटांपर्यंत रुंद करण्यात आला आहे. मागील वर्षी 4.50 भाविक यात्रेत सामील झाले हेते. यंदा हा आकडा 6 लाखापर्यंत जाण्याचा अनुमान आहे.

Advertisement
Tags :

.