अमन सेहरावतचे पॅरिस ऑलिम्पिक तिकीट निश्चित
वृत्तसंस्था/ इस्तंबुल
येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्र फेरीच्या कुस्ती स्पर्धेत भारताचा मल्ल अमन सेहरावतने पुरूषांच्या फ्री स्टाईल 57 किलो गटातून पॅरिस ऑलिम्पिकचे आपले तिकीट आरक्षित केले आहे. मात्र भारताच्या दीपक पुनियाचे ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न संपुष्टात आले आहे. पुनियाला पात्र फेरीच्या स्पर्धेतच पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली.
अमन सेहरावत हा वरिष्ठांच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील गट विजेता असून त्याने 23 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळविली होती. 20 वर्षीय अमन हा छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीचा सराव करतो. पात्र फेरीच्या 57 किलो वजन गटातील तीन लढतींमध्ये अमनने दुहेरी गुणसंख्या नोंदविली. तसेच त्याने 3 पैकी 2 लढती तांत्रिक सरस गुणावर जिंकल्या. आता येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा अमन सेहरावत हा पहिला पुरूष मल्ल आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा भारतीय मल्ल रवी दाहियाने 57 किलो वजन गटात आपला सहभाग दर्शविला होता. भारताच्या सुजित कालकलने पुरूषांच्या 65 किलो गटात चांगली कामगिरी केली. पण त्याला उपांत्य लढतीत मंगोलियाच्या ओचिरकडून पराभव पत्करावा लागला. 86 किलो वजन गटात दीपक पुनियाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. चीनच्या झुशेन लिनने पुनियाचा 4-3 असा निसटता पराभव केला. 74 किलो वजन गटात जयदीप अहलावतचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. स्लोव्हाकियाच्या तैमुरेजने अहलावतचा 3-0 असा पराभव केला. त्याचप्रमाणे 97 किलो गटात दीपक आणि 125 किलो गटात सुमित मलिक यांना पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.