कारिवडेत अल्टो कार कोसळली गटारात
जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे अपघात
ओटवणे : प्रतिनिधी
कारिवडे - ओटवणे मुख्य मार्गादरम्यान आपट्याचे गाळू प्राथमिक शाळा नजीकच्या अरुंद रस्त्यासह कोसळलेल्या मोरीमुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत असून बुधवारी सकाळीच या मार्गावर अल्टो कार गटारात जाऊन कोसळली. या घटनेत सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या कोसळलेल्या मोरीसह रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी शिवसेनेचे कारिवडे उपविभाग प्रमुख रवी परब यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे. कारिवडे आपट्याचे गाळू प्राथमिक शाळा नजीक मोरी कोसळलेली असून हा रस्ताही अरुंद आहे. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होतात. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे लक्ष वेधूनही कोणतेही कार्यवाही होत नाही. त्यामुळेच बुधवारी सकाळी या ठिकाणी पुन्हा अपघात घडला. अल्टो कार चक्क गटारात जाऊन कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. त्यानंतर ग्रामस्थ व जेसीबीच्या सहाय्याने ही अल्टो कार रस्त्यावर आणण्यात आली.