For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसाच्या स्वभावातले भाव भगवंतांनी निर्माण केलेले असले तरी ते त्यात नसतात

06:30 AM Jul 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
माणसाच्या स्वभावातले भाव भगवंतांनी निर्माण केलेले असले तरी ते त्यात नसतात
Advertisement

ज्या गोष्टींमध्ये भगवंतांची विशेष उपस्थिती असते त्या वस्तू नावारूपाला येतात. त्याबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, पाण्यामध्ये ओलावा, वाऱ्यामध्ये स्पर्श, चंद्र-सूर्यामधील तेज, वेदातील ओंकार अशा अनेक गोष्टी सांगता येतील की, ज्यामध्ये माझी विशेष उपस्थिती असते. स्वभावात राग आणि द्वेष नसलेल्या बलवानांचे बल मी आहे. धर्माला अनुसरून असलेल्या इच्छांमुळे धर्माचा उत्कर्ष होतो, त्या चांगल्या इच्छा माझ्यामुळेच निर्माण होतात. त्यामुळे सृष्टीची वाढ होते, विश्व समाधानी होते. अशा इच्छामुळे वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत होत राहते.

Advertisement

माझ्यातूनि तिन्ही झाले सात्त्विकादिक भाव ते । परी त्यांत न मी राहे ते चि माझ्यांत राहती ।। 12 ।।

हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार सात्विक, राजस, तामस हे भाव भगवंतांपासून उत्पन्न झालेले आहेत पण ते त्या भावात नसतात. ह्यासाठी व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर असे म्हणता येईल की, मोटार तयार करणाऱ्या कारखानदाराचा गाडीच्या अपघातात सहभाग नसतो त्याप्रमाणे माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करणारे भाव भगवंतांनी निर्माण केलेले असले तरी त्याने कोणत्यावेळी कसं वागावं हे भगवंत ठरवत नाहीत. ते ठरवण्याचा अधिकार भगवंतांनी माणसाला दिलेला आहे आणि मनुष्य त्याच्या स्वभावानुसार ते ठरवत असतो. म्हणून रज, तम गुणांचे प्राबल्य असलेला स्वभाव माणसाला पूर्वप्रारब्धानुसार प्राप्त झाला असेल तर तो सात्विक होण्यासाठी त्याने प्रयत्न करावा. त्यासाठी संत साहित्याचा अभ्यास करावा, सतत देवाचे स्मरण करावे म्हणजे हातून योग्य वर्तणूक घडत जाऊन स्वभावात सत्वगुणाची वाढ होऊन तो सात्विक होईल. त्यामुळे तो आत्मोद्धाराच्या दिशेने जलद पुढे सरकू शकेल. माणसाच्या स्वभावात असलेले भाव भगवंतांनी निर्माण केलेले असले तरी त्या भावात ते नसतात हे समजावून सांगताना माउली आणखी काही उदाहरणे देतात. ते म्हणतात, आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, त्या ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नाहीत. तसेच त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखित तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी नसते किंवा अग्नीपासून धूर तयार होतो त्या धुरात अग्नी नसतो. त्याप्रमाणे जरी भाव भगवंतांपासून झाले तरी त्या भावात ते नसतात.

Advertisement

भगवंतांनी सांगितलं की, त्रिगुण माझ्यापासून निर्माण झाले असले तरी मी त्यापासून वेगळा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे आपणही गुणापासून वेगळे होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची व आपली विचारसरणी सारखी होईल. भगवंतांनाही आपल्याकडून तेच अपेक्षित आहे. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, ह्या त्रिगुणांपासून वेगळे होण्याचा प्रयत्न न करता ह्या सत्व, रज व तम ह्या गुणांच्या मोहात ते पडतात. त्यामुळे गुणांहून वेगळ्या आणि सुख, दु:ख, इच्छा, क्रोध हे विकार नसलेल्या मला ओळखत नाहीत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.