देह जरी नाशवंत असला तरी त्यात असलेले आत्मतत्व किंवा आत्मा अमर असतो
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, धैर्यशील, ज्ञानी पुरुषाला सुखदु:खांशी काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे तो कायम स्थिर असल्याने मोक्षलाभास पात्र असतो. असा मनुष्य पूर्णपणे ब्रम्हरूप असतो.
मिथ्या वस्तूला अस्तित्व कधीच नसते आणि सत्य गोष्टीचा कधी नाश होत नाही ह्या अर्थाचा
नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि । निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ।।16।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार संत हे जाणून असतात की, समोरची वस्तू ही कायम टिकणारी नसते म्हणून ती मिथ्या आहे पण सर्व वस्तुत असलेले चैतन्य म्हणजे ईश्वरी अस्तित्व मात्र सत्य असल्याने त्याचा कधीही नाश होत नाही. अज्ञानी माणसाला प्रत्येक वस्तूतील ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होत नसते पण ज्याप्रमाणे राजहंस पाण्याशी एकरूप होऊन गेलेले दुध निवडून वेगळे करतो त्याप्रमाणे संत प्रत्येक वस्तूतले ईश्वरी अस्तित्व वेगळे काढून पाहू शकतात. चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू बाजूला काढून केवळ शुद्ध सोने निवडून घेतात अथवा दही घुसळले असता लोणी दृष्टीस पडते किंवा एकत्र झालेले भूस व धान्य पाखडले असता धान्य जाग्यावर रहाते व फोलकट उडून जाते. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष सत्य असलेले ईश्वरी अस्तित्व आणि मिथ्या प्रपंच ह्यांच्या सळमिसळीतून मिथ्या प्रपंच सहजी वेगळा करून नजरेआड करतो, त्यामुळे त्याच्याकडे खरोखर एक ब्रह्म मात्र उरते.
वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे मिथ्या गोष्टीना अस्तित्व नसल्याने त्या जरी दिसत असल्या तरी तो केवळ एक आभास असतो. फळ्यावर काढलेले चित्र कितीही सुंदर असले तरी ते पुसून टाकले की, तेथे फक्त कोरा फळा असतो. त्याप्रमाणे समोर दिसणारे कौरव आभासी आहेत. मग त्यात किती गुंतून पडायचं हे तुझं तूच ठरव असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. समोर दिसणारे विश्व हा जर मृगजळाप्रमाणे भासत असेल तर प्रत्यक्षात ते कुणी व्यापले असेल हा प्रश्न मनात उभा राहतो. त्याचे उत्तर देताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, हे सारे विश्व अविनाशी तत्वाने व्यापले आहे आणि त्या तत्वाचा नाश कुणीही करू शकत नाही.
ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू । नाश त्या नित्य-तत्वाचा कोणी हि न करू शके ।। 17 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, सूक्ष्म विचार केला असता, असे लक्षात येईल की, फळ्यावर अनेक चित्रे काढली जातात आणि कालांतराने पुसली जातात. त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात. त्या तात्पुरते अस्तित्व असलेल्या शरीरांना नाम, वर्ण व आकार असतो. मात्र या तिन्ही लोकात ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार, अशी काही लक्षणे नाहीत मात्र तो शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. त्याचा नाश करू म्हणलास तरी होणार नाही.
मग प्रश्न असा येतो की, देह तर आज ना उद्या नष्ट होणार आहेत मग लढायचे तरी कुणासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, देह जरी नाशवंत असला तरी त्यात असलेले आत्मतत्व किंवा आत्मा अमर असतो. त्या आत्म्यासाठी तू लढ.
विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत । नित्य नि?स्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ।। 18 ।।
आत्म्याच्या उद्धारासाठी स्वधर्म पालन करणे महत्त्वाचे असते. अर्जुन क्षत्रिय असल्याने दुष्टांचा नाश करून सुष्टांचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य होते म्हणून भगवंत म्हणाले, विनाशी देहासाठी न लढता तुझ्या आत्म्याच्या उद्धारासाठी तू लढ.
क्रमश: