For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘फ्लाय ओव्हर’ उभारणीवेळी पर्यायी रस्ते

12:34 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘फ्लाय ओव्हर’ उभारणीवेळी पर्यायी रस्ते
Advertisement

पर्वरी ते सुकुरपर्यंत होणार फ्लाय ओव्हर : बांधकामावेळी सुरळीत वाहतुकीसाठी निर्णय

Advertisement

पणजी : राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्गांपैकी एक बनलेल्या पर्वरी-म्हापसा मार्गावरील सध्याचीच वाहतूक हाताळताना पोलिसांना नाकेनऊ येतात. त्यात आता तेथे होऊ घातलेल्या नवीन फ्लाय ओव्हर महामार्गाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता गृहित धरून या महामार्गासाठी पर्यायी दोन रस्ते निर्माण करण्याचा विचार साबांखाने चालविला आहे. राज्य सरकारने पर्वरीत महामार्ग उभारण्यासाठी राजस्थान येथील राजेंद्र सिंग भांबू इफ्रा या कंपनीला ऊ. 364 कोटींच्या कामाचे कंत्राट बहाल केले आहे. त्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. त्या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीवर ताण वाढून लोकांची गैरसोय होणार आहे. त्यासाठी पर्यायी महामार्ग निर्माण करणे हाच एकमेव पर्याय राहणार असल्याने त्यादृष्टीने साबांखाने तयारी चालविली आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून दोन रस्ते निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी एक रस्ता सुकूर भागातून जाणार आहे. दुसरा रस्ता चोगम मार्गाजवळून जाणार आहे.

रोज 40 हजार वाहनांची गर्दी

Advertisement

एका पाहणीनुसार पर्वरी भागातून सध्या रोज किमान 40 हजार वाहने ये-जा करतात. यावरून या रस्त्याचा किती वापर होतो त्याचा अंदाज येतो. अशावेळी नवीन फ्लायओव्हरसाठी रस्त्याच्या बांधकामासाठी खोदकाम, बांधकाम साहित्य, अन्य यंत्रणा आणि कामगारांची वर्दळ सुरू होईल तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. त्यासाठीच नवीन पर्यायी रस्त्यांची गरज अधोरेखित झाली असून हाच त्यावर एकमेव उपाय ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच साबांखाने दोन रस्त्यांचे पर्याय निवडले आहेत.

कुठ्ठाळीप्रमाणे हंगामी, पर्यायी रस्ते

परिस्थिती अशी असली तरीही ही योजना वाटते तेवढी सोपी नाही. कारण ज्या भागात सध्या रस्ते नाहीत, अशा जमिनीत हे रस्ते निर्माण करावे लागणार असून त्यासाठी संबंधित जमीन मालकांची परवानगी मिळविणेही आवश्यक ठरणार आहे. सुकूर भागातून येणारा रस्ता पर्वरी साई सर्व्हिसजवळ मुख्य मार्गाला जोडला जाणार आहे. कुठ्ठाळीत झुवारी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असताना ज्या प्रकारे अनेक ठिकाणी हंगामी पर्यायी रस्ते बनविण्यात आले होते, त्याच धर्तीवर पर्वरी भागात हे पर्यायी रस्ते बनवावे लागणार आहेत, अशी माहिती साबांखातील अधिकाऱ्याने दिली.

फ्लाय ओव्हरच्या बांधकामास लागणार दोन वर्षे

सध्या पर्वरी-म्हापसा महामार्गावर दुपदरी लेनमधून वाहतूक चालते. त्याशिवाय या भागात सांगोल्डामधून वाहतूक करण्यासाठी अन्य दोन लेन उपलब्ध आहेत. आता उभारण्यात येणारा नवीन फ्लायओव्हर या महामार्गावरच उभारण्यात येणार असून तो सहा पदरी असेल. डेल्फिनो सुपरमार्केटपासून प्रारंभ होऊन पर्वरीतील जुन्या मार्केटपर्यंत बांधण्यात येणार आहे. या फ्लायओव्हरचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज संबंधित बांधकाम कंपनीने वर्तविला आहे.

Advertisement
Tags :

.