रो-रो बोटसाठी जयगड ऐवजी ‘अल्ट्राटेक’चा पर्याय
चिपळूण :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात सुरू असलेल्या रो-रो बोट सेवेसाठी तालुक्यातील जयगड बंदरात 100 टक्के तयारी नसल्याने सध्या अल्ट्राटेकच्या जेटीवर आमची तयारी सुरू आहे. ही बोटसेवा दररोज सुरू राहणार आहे. मांडवा येथून बोट निघाली की रत्नागिरीत थांबून पुढे विजयदुर्गला प्रवासी, दिडशे गाड्या उतरल्या की दोन तास थांबून ती पुन्हा निघणार आहे. म्हणजे दररोज मुंबईला जाऊ येऊ शकता. यातून कोकणातील जनतेला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गात देवगडमध्ये स्वतंत्र मत्स्य महाविद्यालय यावर्षापासून सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी कृषीमंत्र्यांची जबाबदारी दुसऱ्यांकडे गेल्याने याला थोडा विलंब झाला असला तरी महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने पुढच्या मंगळवारी कृषीमंत्र्यांवरोबर बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री नीतेश राणे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर कोकणात सुरू होणारी रो-रो बोट सेवा ही केवळ गणेशोत्सवापुरती नसून नियमित वर्षभर सुरू राहणार असल्याची घोषणा करतानाच गणेशोत्सवात ‘मोदी एक्स्प्रेस’ला रत्नागिरीत थांबा देण्यात आल्याचेही सांगितले. चाकरमान्यांनी बुकिंगसाठी भाजप जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन राणे यांनी केले.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मंत्री राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, देवगडमध्ये स्वतंत्र मत्स्य महाविद्यालय सुऊ करण्याच्या दृष्टीने आमची सर्व तयारी झाली आहे. सर्व पायाभूत सोयीसुविधा तयार आहेत. कृषीमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर माझी अपेक्षा आहे की, हे महाविद्यालय सुरू होईल. शिवाय हे महाविद्यालय दापोलीशी संलग्न असणार आहे, नागपूरशी नाही.
जिल्हा नियोजन समितीतील निधीतील भेदभावावर बोलताना ते म्हणाले की, खरं आहे. आम्हांला पुरेसा निधी मिळत नाही. किरण सामंत, उदय सामंत, शेखर निकम यांना प्रत्येकी 20 कोटी, तर खासदार असलेल्या नारायण राणेंना केवळ 5 कोटी दिले जातात. जिल्हा नियोजनमध्ये आमची ताकद वाढल्याशिवाय हा भेदभाव थांबणार नाही, आजला कोकणात भाजपचे नेटवर्क गावागावात आहेत. त्यामुळे एकही मतदारसंघ भाजपच्या ताकदीशिवाय कुणी निवडून येऊ शकत नाही. आमच्याकडे जिल्ह्यात आमदार नाहीत, फक्त खासदार आहेत. तेही भाजपच्या कार्यकर्त्यानी निवडून आणल्याचे सांगितले.
- महामार्गच्या दुरवस्थेबाबत पाठपुरावा सुरू
शहरातील वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीतील मुखाशी साठलेल्या गाळ उपशाला मेरिटाईम बोर्डकडून रखडलेल्या परवानगीबाबत बोलताना राणे म्हणाले की, माझं यासंदर्भात येथील प्रांताधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. मी माझ्या विभागाला सांगून तत्काळ परवानगी देण्यास सांगणार आहे. मुंबई-गोवा महामार्गच्या दुरवस्थेबाबत आम्ही फारसे समाधानी नसलो तरी त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र सध्या सुरू असलेले काम पाहता पुढील वर्षी प्रश्न विचारण्याची वेळ येणार नसल्याचे सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका विधानांवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, मनाप्रमाणे झालं नाही की लोकशाही धोक्यात, असे नाही. मुंबई महापालिकेत महायुतीचाच भगवा महापौर बसणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. भास्कर जाधव यांनी ब्राम्हण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना जाधव यांची जी भूमिका आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का, हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. मग त्याचे पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये कसे पडसाद उमटतात ते आम्हीही पाहू, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, गुहागरचे माजी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, खेड दक्षिण मंडळ अध्यक्ष विनोद चाळके, गुहागरचे अभय भाटकर, खेडचे ऋषिकेश मोरे, चिपळूणचे उदय घाग, दापोलीचे सचिन होडबे, अध्यक्षा जया साळवी, मंडणगडचे प्रवीण कदम उपस्थित होते.