‘उटा’बरोबरच आता ‘गाकुवेध’ही जागृत
लवकरच आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन
त.भा. विशेष प्रतिनिधी
पणजी : ‘उटा’ बरोबरच आता पुन्हा एकदा ‘गाकुवेध’ संघटनाही जागृत होत असून धनगरांना अद्याप आदिवासीचा दर्जा न मिळणे आणि आदिवासींना राजकीय आरक्षण मिळणे या प्रश्नावरून ही मंडळी आता एकत्र येत आहे. लवकरच आझाद मैदानावर ते मोठे शक्ती प्रदर्शन घडविण्याच्या तयारीत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रविवारी झालेल्या बैठकीत एकंदरीत पुढे कोणते निर्णय घ्यायचे यासंदर्भात चर्चा झाली आहे. मात्र त्यातील कोणतेच निर्णय जाहीर केलेले नाहीत. केवळ सरकारला थोडी मुदतवाढ दिलेली आहे. लवकरात लवकर विधानसभा निवडणुकीत आरक्षण जाहीर करा, एवढी मागणी केलेली आहे. आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यात होणारी दिरंगाई आणि धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा मिळत नसल्यामुळे त्या समाजांमध्ये निर्माण झालेली नाराजी यातून गाकुवेध संघटना पुन्हा जागृत झाली आहे. सर्वजण एकत्रितपणे पणजीत आझाद मैदानावर येऊन शक्तिप्रदर्शन घडविण्याच्या तयारीत आहेत.
मुख्यमंत्री, भाजपाध्यक्ष काढणार तोडगा
दरम्यान सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये या प्रश्नावर आता चर्चा सुरू झाली असून यावर तोडगा कशा पद्धतीने काढावा, या संदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे दोघेजण आदिवासी नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
राजकीय आरक्षणाची मागणी ज्यावेळेपासून केलेली आहे, त्या प्रत्येकवेळी सरकारने मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळेच आदिवासी नेते एकत्रित येऊन सरकारसमोर आता शक्तीप्रदर्शन घडविणार आहेत, जेणेकरून सरकार त्याची दखल घेऊन या मागण्या मान्य करील.
भाजपच्या आदिवासी नेत्यांना वंचित ठेवू नये
भाजपचे जे आदिवासी नेते आदिवासींसाठी काम करीत आहेत, त्यापैकी कोणालाही आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी देखील आदिवासी संघटना प्रयत्न करणार आहेत.