महायुतीच्या जागावाटपासह जि. प अध्यक्षाचा फॉर्म्युला निश्चित !
जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर शिवसेना 19 जागा लढणार ; जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष भूषविणार.
कणकवली / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती निश्चित झाल्यानंतर जागा वाटप निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपा 31 तर शिवसेना 19 जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या 100 जागांपैकी भाजपा 63 आणि शिवसेना 37 जागा लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव आल्यामुळे त्यांना देखील समाधानकारक जागा देण्यात येतील अशी माहिती देतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे भाजप तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती भाजपनेते खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.येथील ओम गणेश या निवासस्थानी पत्रकार परिषदेत श्री राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे ,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आदी उपस्थित होते.श्री राणे म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या 11 तर शिवसेना ६ जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या भाजप 17 आणि शिवसेना 17 जागा लढविणार आहे. कुडाळ - मालवण मतदारसंघात भाजप ४ आणि शिवसेना 11 जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या भाजपा 15 आणि शिवसेना 15 जागा लढविणार आहे. कणकवली मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदेच्या 16 आणि शिवसेना 2 तर पंचायत समितीच्या भाजप 31 आणि शिवसेना पाच जागा लढविणार आहे अशी माहिती श्री राणे यांनी दिली.