प्रश्नपत्रिकेसोबतच उत्तरपत्रिकाही हाती!
विद्यार्थी सुखावले, पण क्षणभरासाठी! डिचोली येथील हायस्कूलमधील प्रकार
पणजी : गोवा शालांत मंडळाच्या इयत्ता नववीच्या उर्दू विषयाच्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिकेसोबतच उत्तरपत्रिकाही विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे शालांत मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्यात उर्दू विषय असलेल्या दहापैकी एका शाळेत हा प्रकार घडला. डिचोली तालुक्यातील शाळेमध्ये काल गुऊवारी हा खळबळजनक प्रकार घडला. मात्र पेपर सुरू होण्याच्या वेळीच सदर प्रकार शिक्षकांच्या लक्षात आल्याने परीक्षेवर फारसा परिणाम जाणवला नाही. तसेच हा प्रकार एकाच शाळेत घडला असल्याने त्याही परिस्थितीत मंडळाची पत राखली गेली आहे. गोवा शालांत मंडळाच्या चुकीमुळे सदर प्रकार घडल्याचे मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो यांनीही मान्य केले असून या प्रकाराच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिकांना उत्तरपत्रिका का जोडण्यात आल्या, त्या कुणी व का जोडल्या, याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे शेट्यो यांनी सांगितले. खरे तर शालांत मंडळाकडून प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरपत्रिकाही पाठविण्यात येतात. मात्र त्या वेगवेगळ्या पार्सलमध्ये बंद केलेल्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती दोन्ही पत्रिका पडण्याची शक्यताच नसते. मात्र उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिका पाठविताना संबंधित कर्मचाऱ्याने चुकून त्या एकाच पार्सलमध्ये बंद केल्या असतील व त्यातूनच हा घोळ झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिचोलीतील सदर शाळेत परीक्षेच्या वेळी ते पार्सल उघडण्यात आले तेव्हा प्रश्नपत्रिकेला जोडून उत्तरपत्रिकाही आढळून आल्या. सुदैवाने तो प्रकार परीक्षा केंद्रातील शिक्षकाच्या लक्षात आला व त्याने योग्य खबरदारी घेत तत्काळ सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वेगळ्या केल्या, अशी माहिती शेट्यो यांनी दिली.