मृत राजासोबत सेवकांचाही दिला जायचा बळी
प्राचीन इजिप्तमधील राजांच्या अंत्यसंस्काराचे गूढ उलगडले
प्राचीन इजिप्तमधील राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सेवकांना आणि राजदरबारी अधिकाऱ्यांना ठार मारून राजाच्या थडग्याजवळ दफन केले जात होते का या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या प्रश्नावर नव्या संशोधनामुळे महत्त्वाचा प्रकाश पडला आहे. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी कवट्यांच्या आधुनिक न्यायवैद्यक तपासणीत काही व्यक्तींच्या डोक्याला मृत्यूच्या आसपास गंभीर दुखापती झाल्याचे पुरावे आढळले आहेत. या जखमा राजाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत सेवकांचाही बळी दिला जात असल्याच्या शक्यतेला बळ देतात.
46 कवट्यांच्या तपासणीतून समोर आले पुरावे
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील मानववंशशास्त्र संशोधक डॉ. रोझलिन कॅम्पबेल यांनी प्राचीन इजिप्तमधील अबिडोस येथून मिळालेल्या मानवी अवशेषांचा नव्याने अभ्यास केला. या संशोधनाचे निष्कर्ष प्रंटियर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या अभ्यासात इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या डकवर्थ संग्रहात जतन केलेल्या 46 मानवी कवट्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 कवट्यांवर गंभीर दुखापतींच्या खुणा आढळल्या. म्हणजेच सुमारे 39 टक्के कवट्यांवर मृत्यूच्या आसपास झालेल्या संभाव्य प्राणघातक जखमांचे पुरावे होते.
अबिडोस येथे नेमके काय घडले होते?
अबिडोस हे दक्षिण इजिप्तमधील नाईल नदीच्या खोऱ्यात वसलेले एक महत्त्वाचे प्राचीन धार्मिक अन् राजकीय केंद्र होते. येथे उम्म अल-काब या दफनभूमीत इजिप्तच्या पहिल्या राजवंशातील राजांची थडगी आढळतात. ही थडगी सुमारे ईसवी सन पूर्व 3078 ते 2900 कालखंडाशी संबंधित आहेत. राजाच्या मुख्य थडग्याच्या आसपास अनेक लहान थडगी बांधण्यात आल्या होत्या. या थडग्यांमध्ये राजदरबारी अधिकारी, कारागिर आणि राजघराण्याशी संबंधित इतर व्यक्तींचे अवशेष सापडले. काही राजकीय दफनसमुहांभोवती शेकडो लहान थडगी असल्याचे पुरातत्वीय नोंदीमधून स्पष्ट होते.
सेवकांना का मारले जात असावे?
प्राचीन इजिप्तमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल अनेक धार्मिक समजुती होत्या. राजाचा मृत्यू झालातरी त्याचे अस्तित्व परलोकात सुरू राहते आणि तेथेही त्याला सेवक, अधिकारी आणि इतर सुविधांची आवश्यकता असते अशी धारणा असू शकते. याच पार्श्वभूमीवर इतिहासकारांनी रिटेनर सॅक्रिफाइस ही संकल्पना मांडली आहे. यामध्ये एखाद्या शासकाच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित व्यक्तींना ठार मारून त्याच्या थडग्यानजीक दफन केले जात असे, जेणेकरून त्या व्यक्ती परलोकातही राजाची सेवा करू शकतील. तथापि सर्व सेवकांना स्वेच्छेने मृत्यू स्वीकारायचा होता असे मानता येत नाही. काही व्यक्तींनी धार्मिक श्रद्धेतून किंवा सन्मानाच्या कल्पनेतून सहभाग घेतला असण्याची शक्यता आहे.
कवटींवरील जखमा
संशोधकांना काही कवट्यांवर सरळ रेषेत गेलेल्या भेगा आणि धारदार वस्तूमुळे झालेल्या जखमा आढळल्या. एका कवटीवर डोळ्याच्या भागाजवळ कापल्यासारखी गंभीर जखम असल्याचेही नमूद करण्यात आले. या जखमांचे वैशिष्ट्या असे की त्या व्यक्तींच्या मृत्यूच्या आसपास झाल्या असाव्यात. अशा प्रकारच्या दुखापतींमुळे मेंदूला गंभीर ईजा, अंतर्गत रक्तस्राव आणि वेगाने बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. मात्र नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, व्यक्तींना कोणत्या परिस्थितीत मारण्यात आणि प्रत्येक मृत्यूचा संबंध राजाच्या अंत्यसंस्काराशी होता का हे निश्चित झालेले नाही.
1920 च्या दशकात उत्खनन
या प्रकरणाचा इतिहास जवळपास 100 वर्षांपूर्वी सुरू होतो. ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ फ्लिंडर्स पेट्री यांनी 1920 च्या दशकात अबिडोस परिसरात उत्खनन केले होते. राजाच्या थडग्याभोवती मोठ्या संख्येने व्यक्तींना दफन करण्यात आल्याचे पाहून पेट्री यांनी या व्यक्तींचा मृत्यू राजाच्या अंत्यसंस्काराशी संबंधित सामूहिक बलिदानामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र त्या काळातील तपासणीत हाडांवर प्राणघातक जखमांचे ठोस पुरावे मिळाले नव्हते. त्यामुळे या सिद्धांतावर दीर्घकाळ वाद सुरू राहिला. पेट्री यांनी अनेक मानवी अवशेषांना पुन्हा दफन केले होते. काही कवट्या मात्र जतन करून इंग्लंडमध्ये पाठवण्यात आल्या. याच जतन केलेल्या कवट्यांपैकी 46 कवट्यांचा डॉ. कॅम्पबेल यांनी आधुनिक पद्धतीने अभ्यास केला.
