ममतांची माफीसोबतच राजीनाम्याचीही तयारी
मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित बैठकीकडे आंदोलनकर्त्या डॉक्टरांची पाठ
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुऊवारी संध्याकाळी जनतेची माफी मागितली आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासही तयार असल्याचे ममता म्हणाल्या. कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी कनिष्ठ डॉक्टर 32 दिवसांपासून संपावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुऊवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावले होते. ममता बॅनर्जी राज्य सचिवालय नबन्नो येथे 2 तास प्रतीक्षा करत होत्या. पण डॉक्टर आले नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 30 डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला आत जाण्याची परवानगी द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. तसेच सभेचे लाईव्ह स्ट्रिमिंग करावे. या अटी सरकारने मान्य केल्या नाहीत.
डॉक्टर बैठकीला न आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. आज डॉक्टर आणि सरकारमध्ये चर्चा होऊन या आंदोलनावर तोडगा निघेल अशी अपेक्षा मला होती. पण तसे होऊ शकले नाही. लोकांची इच्छा असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मलाही आरजी कर मेडिकल कॉलेजच्या बलात्कार-हत्याप्रकरणी न्याय हवा आहे. मला खुर्ची किंवा पदाशी कसलीही आसक्ती नाही, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
आज मी दोन तास आंदोलक डॉक्टरांची वाट पाहिली, पण ते बोलायला तयार नव्हते. कनिष्ठ डॉक्टरांनी काम बंद पाडल्यामुळे आतापर्यंत 27 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 7 लाखांहून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. ऊग्णांची प्रकृती बिघडत आहे, असे असूनही, मी त्यांना माफ केले आहे, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार-हत्येचे प्रकरण न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत आम्ही या बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यास परवानगी देऊ शकत नाही. आम्ही या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची तयारी केली होती, असेही ममतांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत, तरीही गेल्या तीन दिवसांपासून मी ते येण्याची वाट पाहत आहे आणि त्यांच्या समस्या सोडवल्याचा दावाही त्यांनी केला.