महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जवळजवळ ठरलंच...!

07:45 AM May 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्धरामय्यांच्या नावाची घोषणा निश्चित : आज दिल्लीत काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक

Advertisement

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisement

दोन दिवसांपासून नवी दिल्लीत मुख्यमंत्री निवडीसाठी सुरू असलेली कसरत अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच दोन महत्त्वाची खाती देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे सुत्रांकडून समजते. बुधवारी सकाळी पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री निवडीची अधिकृत घोषणा होऊ शकते.

वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात समेट घडवून आणण्याची जबाबदारी खर्गेंवर सोपविली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 11 वाजता दिल्लीत खर्गेंच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरीय बैठक होईल. या बैठकीत पक्षनिरीक्षकांचा अहवाल, कर्नाटकातील काँग्रेस आमदारांनी व्यक्त केलेल्या मतांविषयी चर्चा होईल. बैठकीला राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व इतर नेते उपस्थित राहतील. यावेळी औपचारिक चर्चा झाल्यानंतर खर्गेंकडून विधिमंडळ नेत्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

एकामागोमाग बैठका

नवी दिल्लीत मंगळवारी देखील एका मागोमाग बैठका झाल्या. सकाळी वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल या नेत्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री निवडीसाठी विचारविमर्श करण्यात आला. तसेच राहुल गांधींनी खर्गेंना मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची सूचना दिली. त्यानुसार सायंकाळी खर्गे यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी त्यानंतर सिद्धरामय्यांशी चर्चा केली. तत्पूर्वी शिवकुमार यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश यांनीही खर्गे, सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल यांच्याशी चर्चा केली.

शिवकुमार भूमिकेवर ठाम

हायकमांडच्या सूचनेवरून मंगळवारी सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्याला मुख्यमंत्रिपद द्या. हे पद नसेल तर दुसरे कोणतेही पद नको, अशी ठाम भूमिका घेतली. तर खर्गे यांनी मुख्यमंत्रिपदाऐवजी दुसरे पर्यायी पद देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, शिवकुमार यांनी कोणतीही तडजोड करण्यास नकार दर्शविला. कोणतेही पर्यायी पद नको. आमदार म्हणूनच पक्षात काम करेन, असे सांगितले. खर्गे आणि शिवकुमार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. खर्गेंसमोर आपल्या मागण्या मांडून शिवकुमार तेथून नाराज होऊन बाहेर पडले. शिवकुमार यांना सोमवारी दुपारी दिल्लीला येण्याची सूचना काँग्रेसश्रेष्ठींनी दिली होती. मात्र, शिवकुमार यांनी आजारी असल्याचे कारण पुढे करत दिल्लीला जाणे टाळले. मंगळवारी दुपारी ते दिल्लीला गेले.

सिद्धरामय्याही मुख्यमंत्रिपदावर बसले अडून

शिवकुमार यांच्यानंतर सिद्धरामय्या यांचे खर्गेंच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यांच्याशीही खर्गेंनी चर्चा केली. सिद्धरामय्याही मुख्यमंत्रिदावर अडून बसले आहेत. त्यामुळे कोणाला मुख्यमंत्री बनवावे, याविषयी यावेळी एकमत झाले नाही. शेवटी खर्गेंनी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना अहवाल सादर केला. त्यामुळे आता बुधवारी सकाळी 11 वाजता काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक होणार असून त्यानंतर विधिमंडळ नेता अर्थात मुख्यमंत्री निवडीची घोषणा केली जाणार आहे.

वेणूगोपाल, सुरजेवाला यांच्याशी सिद्धरामय्यांची चर्चा

खर्गेंच्या भेटीनंतर रात्री सिद्धरामय्या यांनी प्रथम पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली. नंतर राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पुत्र यतींद्र सिद्धरामय्या हे देखील होते.

दोन दिवसांपासून सिद्धरामय्यांचे दिल्लीत ठाण

सिद्धरामय्या सोमवारी सकाळीच आपले पुत्र यतींद्र सिद्धरामय्या, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, डॉ. शरणप्रकाश पाटील, भैरती सुरेश, एच. के. पाटील यांच्यासमवेत दिल्लीला गेले होते. त्यांचे दिल्लीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्य आहे. समर्थक आमदारांमार्फत सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदासाठी वरिष्ठांवर दबाव आणला आहे.

लिंगायत मुख्यमंत्रीसाठी मठाधीशांकडून दबाव

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असताना राज्यातील लिंगायत मठाधीशांनी लिंगायत समुदायातील नेत्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी केली आहे. यासंबंधीचे पत्र मल्लिकार्जुन खर्गेंना पाठविण्यात आले आहेत. लिंगायत समुदायाने यावेळी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. समुदायाचे उमेदवारही मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत, त्यामुळे आपल्या समुदायाला मंत्रिमंडळातही अधिक प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत...

डी. के. शिवकुमार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याबरोबरच 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात येईल. या निवडणुकीपर्यंत ते काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम राहतील. तसेच त्यांना उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच दोन महत्त्वाची खाती देता येतील. त्यानंतर शिवकुमार यांच्याकडे सत्तेचे नेतृत्त्व सोपविण्याचा निर्णय हायकमांडने घेतल्याचे समजते.

कोट्स....

पक्ष माझ्यासाठी ईश्वर, मातेसारखे

काँग्रेस पक्ष माझ्यासाठी ईश्वर आणि मातेसारखे आहे. ईश्वर आणि मातेला मुलांना काय द्यावे, हे माहित असते. मी एक जबाबदार नेता आहे. माझे कर्तव्य निभावले आहे. 135 जागा जिंकून दिल्या आहेत. पक्षाशी गद्दारी करणार नाही. ब्लॅकमेलही करणार नाही.

- डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article