अलमट्टीची उंची वाढल्यास शेतीला फटका? ग्रामसभेत ठराव.., नेमकं काय म्हणाले Raju Shetti?
अलमट्टी धरणाची उंची वाढविल्याने शेती, औद्योगिक व साखर कारखानदारीला सर्वात मोठा फटका बसणार
कोल्हापूर : कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलमट्टी धरण परिसरातील बाधित लोकांना मोबदला देऊन त्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे. याला तीव्र विरोध करण्यासाठी सांगली व कोल्हापूर जिह्यातील पूरबाधित गावातील ग्रामपंचायतींनी 1 मे च्या ग्रामसभेमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील ठराव करून ते प्रधानमंत्री कार्यालयास पाठविण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविल्याने शेती, औद्योगिक व साखर कारखानदारीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असून केंद्र सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा न केल्याने याचा फटका सांगली व कोल्हापूर जिह्याला बसणार आहे. राज्य सरकार जर याबाबत दोन्ही जिह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार असेल तर सामान्य जनतेने एकत्रित येऊन लढा तीव्र करणे गरजेचे आहे. सांगली व कोल्हापूर जिह्यातील बाधित गावे अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास स्थलांतरित करावी लागणार आहेत.
यासाठी सांगली व कोल्हापूर जिह्यातील पूरबाधित गावातील सर्व ग्रामपंचायतींनी एकत्रित येऊन 1 मे च्या ग्रामसभेमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविरोधात ठराव करून तो प्रधानमंत्री कार्यालय, केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयास ठरावाच्या प्रती पाठविण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारने या गोष्टीची दखल न घेतल्यास सांगली व कोल्हापूर जिह्यातील जनतेला सोबत घेऊन तीव्र लढा उभारणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.