For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातृभाषेतून बोलण्यास परवानगी द्या

11:19 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
मातृभाषेतून बोलण्यास परवानगी द्या
Advertisement

प्रतिभा कारंजी स्पर्धां : जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांना म. ए. युवा समितीचे निवेदन

Advertisement

बेळगाव : प्रतिभा कारंजी स्पर्धांमध्ये मराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून बोलण्यास प्रतिबंध करण्यात आले, हा अन्याय असून त्यामुळै विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मिळणारी ही वागणूक आणि भाषिक सक्ती दूर करावी, तसेच तालुका व जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये त्यांना मातृभाषेत बोलण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सोमवार दि. 28 रोजी बी. के. मॉडेल शाळेमध्ये तालुकास्तरावरील प्रतिभा कारंजी स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत मराठी माध्यमातील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला होता. पुढील फेरीत गेल्यावर त्या विद्यार्थ्याला चिठ्ठी निवडून त्यावरील विषयावर बोलावयाचे होते. तथापि तो मराठीमध्ये बोलू लागताच त्याला स्पर्धेतून बाद करण्यात आले. हा मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय असून असे केल्याने त्या विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो व यापुढील स्पर्धांमध्ये भाग घेण्यास ते कदाचित तयार होणार नाहीत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून पाचवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकण्याचा व व्यक्त होण्याचा अधिकार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यावर अन्य भाषेची सक्ती करणे, त्याला स्पर्धेतून बाद करणे हे सर्व अन्यायकारक आहे. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मिळणारी ही वागणूक आणि भाषिक सक्ती दूर करावी. त्यांना तालुका आणि जिल्हास्तरावरील प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये मातृभाषेत व्यक्त करण्यास परवानगी द्यावी. तसेच बी. के. मॉडेल येथे झालेल्या प्रकाराची चौकशी करून परीक्षकांवर कारवाई करावी. सदर स्पर्धा पुन्हा घेऊन अन्याय झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस सुरज कुडुचकर, खजिनदार विनायक कावळे, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, वासू सामजी व सिद्धार्थ चौगुले यांनी हे निवेदन दिले आहे.

Advertisement
Tags :

.