महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आता भाजपविरुध्द मित्रपक्ष

06:57 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणूक निकालात राज्यातील 48 जागांपैकी भाजपला मिळालेल्या 9 जागा तसेच शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या 7 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेली एक जागा बघता, कालच्या मंत्रीमंडळ शपथविधीत राज्यातील भाजपच्या खासदारांचा झालेला समावेश आणि शिवसेना शिंदे गटाला केवळ एका राज्यमंत्रीपदावर केलेली बोळवण लक्षात घेता, आता महायुतीतील भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप व्हायला सुरूवात झाली आहे.

Advertisement

शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे केलेले वक्तव्य लक्षात घेता, लोकसभेचा अनुभव घेता आत्तापासून भाजपवर दबाव टाकण्यास सुरूवात केली तर विधानसभेला भाजपच्या सर्वेत शिवसेनेचे उमेदवार वाढू शकतात. अन्यथा लोकसभेला झाली तशी गत शिवसेनेची होऊ शकते. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचे शिरसाट यांनी केलेले वक्तव्य हा केवळ दबावतंत्राचाच भाग आहे. कारण ज्या उध्दव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे त्यांना लोकसभेला सहानुभुती मिळाली ती सहानुभुती ठाकरे कमीत कमी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवणार यात शंका नाही.

Advertisement

केंद्रीय मंत्रीमंडळाचा शपथविधी कालच झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महायुतीतील मित्रपक्षांची खदखद चव्हाट्यावर यायला सुरूवात झाली आहे. निवडणूक आणि मंत्रीमंडळ शपथविधी होईपर्यंत संयम ठेवलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी आता व्यक्त व्हायला सुरूवात केली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेला केवळ एकच मंत्रीपद दिल्याने भाजपवर टीका केली आहे. तर तिकडे रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहांच्या माध्यमातून रामटेकचा उमेदवार बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करताना, आपण शहा यांना याबाबत विचारणार असून रामटेकच्या पराभवाला बावनकुळेच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांनी अमित शहा आणि फडणवीस यांनी अमरावती लोकसभा निवडणूक न लढविण्यासाठी मला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काही दिवसापूर्वी सांगितले होते. तर काल राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेला राष्ट्रवादीने किमान 80 जागा लढल्या पाहिजेत असे वक्तव केले आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी म्हणून विधानसभा एकत्र लढवणार असल्याचे कार्यकर्त्यांना निर्देश दिले. महायुतीत मात्र भाजप नेते प्रवीण दरेकर हे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांना महायुतीतील नेत्यांनी जाहीर वक्तव्ये टाळण्याचा सल्ला देत आहेत. मंत्रीमंडळाचा शपथविधी होऊन एक दिवस होत नाही तोवर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कलगीतुरा रंगु लागला असून, आत्तापर्यंत केवळ खासदारकीची उमेदवारी मिळेल किंवा मंत्रीमंडळाची लॉटरी लागेल या आशेवर सगळे गप्प होते. मात्र आता महायुतीतील शिवसेनेच्या नेत्यांनीच आता भाजपला टार्गेट करायला सुरूवात केली असून, भविष्यात भाजपबाबत अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेनेत फुट पाडत भाजपने शिवसेनेच्या सोबतीने ठाकरे यांचे सरकार पाडले. भाजपने ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंना सोबत घेतले नंतर शिंदेंवर टांगती तलवार ठेवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतले. मात्र मतदारांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवला. भाजपने 9 जागा जिंकल्यानंतर दोन कॅबिनेट मंत्रीपदे घेतली ती दोन्ही भाजपच्या उमेदवारांना दिली आहे, तर शिवसेना शिंदे गटाची केवळ एका राज्यमंत्री पदावर बोळवण केल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन जरी भाजपने दिलेले असले तरी अजित पवार गटाला निवडणुकीत जनतेचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे शरद पवार गटाला अजित पवार गट हा पर्याय होऊ शकत नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने भाजपकडून राष्ट्रवादीच्या

कॅबिनेट मंत्रीपदाचे आश्वासन घड्याळ तेच वेळ जुने असे सांगत टाळली जाऊ शकते. कारण जर भाजपला राष्ट्रवादीला मंत्रीपद द्यायचेच असते तर जसे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थान अवामी मोर्चाचे जीतनराम मांझी यांनी भाजपकडे दोन जागा मागितल्या, त्यातील एका जागेवर स्वत: जीतनराम मांझी हे निवडून आल्याने त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले. मात्र अजित पवारांच्या उमेदवाराला स्थान मिळालेले नाही. भाजपने राज्यातील पियुष गोयल, नितीन गडकरी आणि मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रीमंडळात समावेश करताना, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट केला आहे. आता भाजपच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर लक्षात आले की भाजपमध्ये बाहेऊन आलेल्या वाचाळविरांना रोखणे आणि मूळ भाजपच्या असलेल्यांनाच संधी देणे याशिवाय पक्षवाढीसाठी पर्याय नाही, कारण राम सातपुते, नवनीत राणा, रणजितसिंह नाईक-निंबाळकर असो, जनतेच्या प्रश्नांसाठी राजकीय उपद्रव करणारे लोक आवडतात. पण स्वत:च्या प्रसिध्दीसाठी उपद्रव करणारे लोक आवडत नसल्याने पुन्हा एकदा, लोकसभा निकालाने दाखवून दिले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि मराठा समाजाच्या नेत्यांना हलक्यात घेणे, तसेच या आंदोलनाबाबत भाजपच्या नेत्यांनी जी वक्तव्ये केली त्याचा मोठा फटका हा भाजपला मराठवाडा आणि विदर्भात बसला. नागपूर नितीन गडकरी, संभाजीनगर संदिपान भुमरे आणि अकोला अनुप धोत्रे वगळता या भागात भाजपला मोठा धक्का बसला.

विशेष म्हणजे भाजपच्या या मराठा विरोधी भूमिकेचा शिवसेना शिंदे गटालाही फटका बसला असून आता हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपसाठी कोण संकटमोचक असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेला ज्या 31 जागांवर महायुतीला विजय मिळाला, त्या 31 लोकसभा मतदार संघातील अनेक विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हे विरोधी उमेदवाराला मिळालेले मताधिक्य बघता डेंजर झोनमध्ये आले असल्याने राज्य विधीमंडळाचे या विधानसभेचे शेवटचे पावसाळी अधिवेशन 27 जुनपासून सुरू होत असून, यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article