घरासमोरील झाडाचीच अॅलर्जी
माणसांना कुठल्याही गोष्टीपासून अॅलर्जी असू शकते. काही लोकांना धुळीची अॅलर्जी असते, तर काही जणांना परफ्यूम किंवा खाद्यपदार्थांची अॅलर्जी असते. परंतु कुणाला झाडाची अॅलर्जी असल्याचे ऐकले आहे का? अलिकडेच ब्रिटनमध्ये एका महिलेला एका झाडाची अॅलर्जी असल्याचे आणि हे झाड तिच्या घरासमोरच असल्याचे समोर आले आहे. या झाडामुळे तिच्या चेहऱ्यावर फोड येतात, यामुळे ही युवती त्रस्त होत केवळ घर नव्हे तर देश सोडून जाण्याचा विचार करत आहेत.
41 वर्षीय रचना अँडरसन ही नॉरविचच्या ईस्टन नावाच्या गावात राहते. तिच्या घरासमोर एक झाड असून ते स्कॉट्स पाइन ट्री आहे. या झाडामुळे अॅलर्जी होत घरात राहणे अवघड ठरल्याचे तिचे सांगणे आहे. झाडामुळे माझ्या शरीरावर फोड येतात, चेहरा इतका तप्त होतो की जणू आग लागली आहे असे वाटू लागते. या अॅलर्जीमुळे घरात परत जाण्याचीही भीती वाटते असे तिने सांगितले आहे.
रचना आता देश सोडण्यास तयार झाली आहे. रचना ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक होणार आहे. तिने मागील 2 वर्षांमध्ये अनेक वैद्यकीय चाचण्या करविल्या तरीही डॉक्टरांना अॅलर्जीचे कुठलेही कारण समजू शकलेले नाही. जेव्हा मी घरात असते तेव्हाच चेहऱ्यावर फोड येतात आणि माझी प्रकृती बिघडते. याचे कारण हे झाडच असल्याचे मानले जात आहे असे रचनाने म्हटले आहे.
झाड तोडण्यास असमर्थ
इंग्लंडच्या कायद्याच्या अंतर्गत हे एक संरक्षित झाड आहे. यामुळे स्थानिक पालिकेकडून मंजुरी मिळाली तरच ते तोडता येणार आहे. तर पालिका याकरता मंजुरी देईल अशी रचनाला वाटत नाही. अनेकदा मी फॅनसमोर बसते, यामुळे माझ्या चेहऱ्याला काही प्रमाणात दिलासा मिळतो असे तिचे सांगणे आहे. रचना आता पालिकेच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. पालिकेने झाड तोडण्याची अनुमती नाकारली तर ती ऑस्ट्रेलियात जात स्थायिक होणार आहे.