For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नायक खून प्रकरणात सतीश सैल यांचा हात असल्याचा आरोप तथ्यहीन

12:11 PM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
नायक खून प्रकरणात सतीश सैल यांचा हात असल्याचा आरोप तथ्यहीन
Advertisement

काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता-आमदार सैल यांचे निकटवर्तीय शंभू शेट्टी यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

Advertisement

कारवार : अंकोला येथील काँग्रेसचे युवा नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे माजी प्रधान कार्यदर्शी गोपाळकृष्ण नायक यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांचा हात असल्यास पोलिसांनी सैल यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता आणि आमदार सैल यांचे निकटवर्तीय शंभू शेट्टी यांनी केले. गेल्या बुधवारी अंकोला येथे राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांचे निकटवर्तीय असलेल्या गोपाळकृष्ण नायक यांच्यावर सहा जणांनी चाकू आणि रॉडने खुनी हल्ला केला होता.

त्यानंतर नायक यांनी येथे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना आपल्यावरील खुनी हल्ल्याच्या पाठीमागे नाव न घेता आमदार सैल यांच्या हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. नायक यांनी केलेल्या आरोपाचा धागा धरून सोमवारी येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी बोलताना शंभु शेट्टी म्हणाले, नायक यांनी आमदार सैल यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचा आपण निषेध करतो. नायक यांच्यावरील खुनी हल्ल्याशी आमदार सैल यांचा काही एक संबंध नाही. खुनी हल्ल्याच्या पाठीमागे सैल यांचा हात असल्याचे आढळून आल्यास, सैल यांच्यावर पोलीस प्रकरण दाखल करण्यास काही एक हरकत नाही. असे स्पष्ट केले.

Advertisement

शंभू शेट्टी पुढे म्हणाले, नायक यांनी केलेल्या आधारहीन आणि तथ्यहीन आरोपांमुळे केवळ आमदार सैल यांची बदनामी होत नाही तर अशा बिनबुडाच्या आरोपामुळे काँग्रेसच्या इमेजला आणि वर्चस्वाला धक्का बसला आहे. गोपाळकृष्ण नायक यांनी अर्थहीन आरोप करण्याऐवजी खुनी हल्ला केलेल्या मारेकऱ्यांनी आमदार सैल यांनी सुपारी दिली आहे, अशी तक्रार कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीकडे करावी, असा सल्ला दिला.

गोपाळकृष्ण नायक यांच्याकडे आमदार सैल यांच्या विरोधात पुरावे असल्यास त्यांनी ते पोलीस अधिकाऱ्यांकडे द्यावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर, कारवार ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष समीर नाईक यांनी गोपाळकृष्ण नायक यांनी आमदार सैल यांच्यावर केलेले खोटे आरोप फेटाळून लावले आणि अशाप्रकारचे कृत्य कदापी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अरविंद कलगुटकर, कृष्णा मेथा, सीमा पाटील, ज्योती, दीपक वेर्णेकर, दिलशाद, सिद्धार्थ, नुतन जौन आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.