सेबीचे पावित्र्य घालविल्याचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी घालत असून त्यामुळे सेबीचे पावित्र्य नष्ट झाले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी एका वक्तव्याद्वारे ही टीका केली. माधवी बुच यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. असे असूनही त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संरक्षण मिळत आहे. ही बाब सेबीच्या विश्वासार्हतेसाठी योग्य नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेबीचे महत्व कमी केले आहे. सेबीने बऱ्याच वर्षांपासून कष्ट करुन मिळविलेली प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे नाहीशी झालेली आहे. सेबीची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याने शेअरबाजारात पैसे गुंतविलेल्या कोट्यावधी निम्न उत्पन्नदारांची मोठी हानी झाली आहे. त्यांचे पैसे बुडाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशावर अदानी यांचा पगडा निर्माण झाला आहे. माधवी बुच आणि अदानी उद्योग समूह यांची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. कारण त्यांना अदानी यांना वाचवायचे आहे, असे अनेक आरोप खर्गे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचा प्रतिवाद
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोपांची भारतीय जनता पक्षाने खिल्ली उडविली आहे. खर्गे यांचे आरोप हे केवळ हवेत सोडलेले बाण आहेत. माधवी बुच यांनी त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती, त्या सेबीच्या प्रमुख होण्यापूर्वी केंद्र सरकारला दिलेली होती. त्यांनी दिलेल्या माहितीची संपूर्ण पडताळणी करुनच त्यांना सेबीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेस विदेशी शक्तींवर विसंबून राहून खोटे आरोप करीत आहे. बराच काळ केंद्रातील सत्तेपासून दूर राहिल्याने काँग्रेस नेत्यांचे माथे भडकले असून ते बेताल आरोप करीत आहेत. नैराश्याच्या भावनेतून असे आरोप केले जातात. अशा बिनबुडाच्या आरोपांमुळे कोणाचही बुद्धीभेद काँग्रेस करु शकणार नाही. त्यांच्या विधानांमध्ये अर्थ नाही, असे जोरदार प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाने मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले आहे.