केरळ विधानसभेत आरोप, संघाचा इशारा
त्रिशूर पूरम उत्सवाचे प्रकरण : काँग्रेसने केले होते आरोप : पोलिसांच्या भूमिकेवरही संशय
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्रिशूर पूरममध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप केरळ विधानसभेत करण्यात आला होता. याप्रकरणी संघाने सत्तारुढ आणि विरोधी पक्षांकडून संघटनेच्या विरोधात करण्यात आलेल्या अपमानास्पद टिप्पणींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. हा आरोप निंदनीय असून जबाबदार पदांवर बसलेले लोक सभागृहात आणि बाहेर निराधार आरोप करत आहेत असे संघाकडून म्हटले गेले आहे. यंदा आयोजित झालेल्या त्रिशूर पूरममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमागे संघाचा हात असल्याचा आरोप केरळ विधानसभेत डाव्या तसेच काँग्रेस पक्षाने केला आहे.
त्रिशूर पूरम केरळच्या त्रिशूरमध्ये आयोजित होणारा एक वार्षिक हिंदू मंदिर उत्सव आहे. दरवर्षी पूरमच्या दिनी त्रिशूरच्या वडक्कुनाथन मंदिरात हा उत्सव आयोजित होतो. संघाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री विजयन यांच्याकडून गुप्त सहमती दर्शविण्यात आल्यावर आणि त्यांना कल्पना देत उत्सवात अडथळे निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ या आघाडीने केला आहे. त्रिशूर पूरम विधींमध्ये कथितपणे पोलिसांकडून हस्तक्षेप करण्यात आला होता असेही बोलले जात आहे. वादानंतर यंदा एप्रिलमध्ये आयोजित वार्षिक उत्सवासाठीचा उत्साह फिका पडला होता.
अशाप्रकारचे आरोप करण्यामागे कुठला आधार आहे अशी विचारणा संघाचे वरिष्ठ नेते आणि प्रांत कार्यवाहक (उत्तर केरळ) एन. ईश्वरन यांनी केली आहे. संघ नेते याप्रकरणी लवकरच राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि विधानसभा अध्यक्ष ए.एन. शमशीर यांची भेट घेणार आहेत. मंत्री, आमदार आणि विरोधी पक्ष नेत्यासमवेत जबाबदार पदांवर बसलेले लोक स्वत:च्या राजकीय लाभासाठी संघाच्या नावाचा अनावश्यक स्वरुपात वापर करत आहेत. तर संघाकडे अशा वादांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वेळ नाही आणि रुची देखील नाही असे ईश्वरन यांनी सुनावले आहे.
तणाव निर्माण करण्याचा हेतू
राजकीय वादांमध्ये संघाला ओढण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. अशा प्रयत्नांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. केरळच्या त्रिशूर पूरम आणि शबरीमला तीर्थयात्रेसारख्या प्रतिष्ठित उत्सवांमध्ये जाणूनबुजून तणाव आणि वाद निर्माण करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा दावा ईश्वरन यांनी केला आहे.
केरळ विधानसभेत वाक्युद्ध
यापूर्वी प्रतिष्ठित त्रिशूर पुरम उत्सवात निर्माण झालेल्या अडथळ्यांवरून केरळ विधानसभेत बुधवारी वाकय्द्धु दिसून आले. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना अडथळ्यांची पूर्वकल्पना होती असा दावा युडीएफ म्हणजेच काँग्रेसकडून करण्यात आला. तर सत्तारुढ डाव्या आघाडीने या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी फेटाळत याप्रकरणी व्यापक तपास सुरू असल्याचे नमूद केले.