महायुती म्हणजे अतिरिक्त मतांवर डल्ला मारून आलेले सरकार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांचा आरोप
वार्ताहर/कुडाळ
निवडणूका या निष्पक्षपाती व पारदर्शक घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु वाढलेले मतदान परावर्तित करण्याचे काम निवडणूक घेणाऱ्या संस्थेने केलेले आहे. त्याच्यामध्ये दलाली खालेल्ली आहे. सत्ताधाऱ्यांनी हुज्जडेगीरी केली आहे. दरोडा, डल्ला मारला आहे. ज्या स्वायत्त संस्था आहेत, ज्या सरकार म्हणून देशपातळीवर, राज्यपातळीवर काम करतात त्या सगळ्या विकल्या गेल्या आहेत. निवडणूक आयोगाने आपले कर्तव्य पार पाडताना बेईमानी केल्याची अनेक उदाहरणे असून सिंधुदुर्गातील खासदार आमदारांसह निवडून आलेले महायुतीचे सरकार म्हणजे अतिरिक्त मतांवर डल्ला मारून निवडून आलेले सरकार आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
मतदार दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आज राज्यभर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मतदार जागृती केली जात आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कुडाळ-एमआयडीसी येथील शासकिय विश्रमगृहावर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, नागेश मोर्ये, एकनाथ धुरी, केतनकुमार गावडे, अरविंद मोंडकर, साईनाथ चव्हाण, प्रदीप मांजरेकर, आय. वाय. शेख, मेघनाद धुरी, प्रवीण वरूणकर, श्रीकृष्ण तळवडेकर, पांडुरंग नाटेकर, अजिंक्य गावडे,जेम्स फर्नांडिस, निलेश मालडकर, ऍड. अमृता मोडकर आदी उपस्थित होते.