For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर्शनसह 17 जणांवर आरोप

06:10 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
दर्शनसह 17 जणांवर आरोप
Advertisement

रेणुकास्वामी खून प्रकरणात 231 साक्ष : न्यायालयात 3,991 पानी आरोपपत्र दाखल 

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी 3,991 पानी आरोपपत्र बुधवारी न्यायालयात सादर केले. गुन्हा नोंदवताना आरोपी क्र. 2 असलेल्या कन्नड अभिनेता दर्शनला आरोपपत्रात आरोपी क्र. 1 म्हणून गणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आरोपपत्रात आरोपींचे क्रमांक जशास तसे ठेवल्याने पवित्रा गौडा हिलाच ‘आरोपी क्र. 1’ संबोधले आहे. या प्रकरणात एकूण 231 साक्ष नोंदविण्यात आले आहेत.

Advertisement

रेणुकास्वामी खून प्रकरणात 17 आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब (सीएफएसएल) कडून मिळवलेल्या 8 अहवालांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे सीआरपीसी 173(8) अंतर्गत प्राथमिक आरोपपत्र बेंगळूरमधील 24 व्या एसीएमएम न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

आरोपपत्रात पवित्रा गौडा ही प्रकरणात आरोपी क्र. 1 आणि दर्शन आरोपी क्र. 2 असल्याचे नमूद आहे. एकूण 231 साक्ष नमूद करण्यात आले आहेत. यापैकी 27 साक्षीदारांनी न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. 164 अंतर्गत 27 जणांनी, 161 अंतर्गत 70 जणांनी तसेच 8 इतर सरकारी अधिकाऱ्यांनीही साक्ष नोंदविले आहेत. घटनेवेळी दर्शनने निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 28 ठिकाणी झडती घेतली. 17 निवासस्थानांवर धाडी टाकल्या. खुनासाठी वापरलेल्या काठ्या, लाकडाचे तुकडे, सीसीटीव्ही फुटेज व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तपास करताना पोलिसांना रेणुकास्वामीला मारहाण करतानाचे फोटो आरोपी विनय याच्या मोबाईलमधून रिट्रिव्ह झाले आहेत. अनुकुमार यांच्या मोबाईलमधून ऑडिओ क्लिपही हाती लागली आहे. याची माहितीही आरोपपत्रात देण्यात आली आहे.

आठवडाभरानंतर सत्र न्यायालयाकडे खटला

9 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी न्यायाधीशांनी आरोपपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याची प्रत आरोपी किंवा त्यांच्या वकिलांना दिली जाईल. आरोपींच्या वकिलांना दोषारोपपत्राची प्रत दिल्यानंतर आठवडाभरानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग केले जाणार आहे. शिवाय आरोपींनाही समन्स बजावण्यात येणार आहे.

दरम्यान, आठवडाभरात काही आरोपी जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. पवित्रा गौडा, केशवमूर्ती, विनय, अनुकुमार यांनी यापूर्वीच जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. या प्रकरणातील काही बिगर मुख्य आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता आहे. अभिनेता दर्शनचे वकीलही जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

...तर वर्षभरात निकाल

सदर खटला जलदगती न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) किंवा विशेष न्यायालयात वर्ग करण्याचीही शक्यता आहे. सरकार आणि पोलिसांच्या विनंतीवरून तसेच आरोपींच्या वकिलाच्या संमतीने यावर निर्णय घेतला जाऊ शकेल. या खटल्याची सुनावणी जलदगती किंवा विशेष न्यायालयात झाली तर वर्षभरात निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र सामान्य न्यायालयात निकाल लागण्यास तीन-चार वर्षे लागतील.

दर्शनवर आरोप

दोषारोपपत्रात रेणुकास्वामी याचे चित्रदुर्गमधून अपहरण करून बेंगळूरला आणणे, रेणुकास्वामीवर प्राणघातक हल्ला, खुनानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी इतरांना पैसे  देणे, पुरावे नष्ट करणे, असे आरोप अभिनेता दर्शनवर आहेत.

पवित्रा गौडावरील आरोप

रेणुकास्वामी खून प्रकरणातील आरोपी क्र. 1 पवित्रा गौडा ही घटनेवेळी त्या  ठिकाणी हजर होती. तिने रेणुकास्वामीला चप्पलने मारहाण केली. गुन्ह्याच्या वेळी सक्रिय असलेला पवित्रा गौडाचा मोबाईल क्रमांक हा तिच्या सहभागाचा मुख्य पुरावा असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पवित्रा गौडा आणि दर्शनसह 14 आरोपींवर रेणुकास्वामीचे अपहरण, खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचण्याचे आरोप आहेत. पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली कार्तिक, केशवमूर्ती आणि निखिल नाईक यांच्यावर आरोप नमूद असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

Advertisement

.