For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्लाट भजनी प्रकाराचा प्रसार व्हावा !

06:30 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्लाट भजनी प्रकाराचा प्रसार व्हावा
Advertisement

गोवा राज्य केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच प्रसिद्ध नाही तर येथील मंदिरे आणि चर्चेसदेखील पर्यटकांना आकर्षित करतात. गोव्यात समृद्ध देवस्थानांची परंपरा आहे. राज्यातील विविध देवस्थानात धार्मिक विधीबरोबरच भजन, नामवंत गायकांच्या संगीत मैफली तसेच कीर्तनादी कार्यक्रम सुरू असतात. गावातील प्रमुख देवस्थानांबरोबरच प्रत्येक वाड्यावर छोटी-छोटी मंदिरे आहेत. तेथेही भजनाचे कार्यक्रम होतात. यामुळे जणू भक्तिगंगाच गोव्यात अवतरत असते, असे म्हणावे लागेल. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक या मंदिरांनाही भेटी देऊन भजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात व तृप्त होतात.

Advertisement

गोव्यातही फार पूर्वीपासून भजनी परंपरा सुरू आहे. दरवर्षी कला अकादमीतर्फे भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरूष, महिला, बालकलाकार गटात विविध केंद्रावर भजन स्पर्धा होते. जणू काही येथे पंढरपूर अवतरल्याचा भास होतो. गोव्यात अल्लाट ढोलकी भजनी परंपरेचा उगमही झाला आहे. ज्यांनी अध्यात्माची कवाडे साऱ्या जगाला उघडून दिली, अशा थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांच्या पेडणे तालुक्यातील पालये येथील जन्मभूमीत वांगडवाड्यावर या भजनी परंपरेचा उगम झाला आहे. पूर्वी ध्वनिसंकलन व्यवस्था नसल्याने आवाज इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी या अल्लाट (तार सप्तकात गायनकला) भजनी परंपरेचा उगम झाला असावा, असे वाटते. तसेच तबला, हार्मोनिअम सामग्री खर्चिक असल्याने केवळ ढोलकी, टाळ परवडणारे असल्याने  त्याकाळी या वाड्यावर या भजनकलेला पसंती दिली असावी, असे वाटते.

अल्लाट ढोलकी भजनात लय आणि तालाची बाजू ढोलकीवादक सांभाळतो तर पथकातील इतर सर्व कलावंत मुख्य गायकाला साथ करतात. पारंपरिक भजनाप्रमाणेच गजर आणि रूपाचे अभंग या भजनात आळविण्याची प्रथा आहे. परंतु या प्रकाराला बैठक असत नाही. उभे राहूनच हे सादरीकरण करायचे असते. बाजापेटी किंवा हार्मोनिअमसारखे वाद्यही या भजनात वापरले जात नाही. परंतु टाळ मात्र पारंपरिक भजनाप्रमाणेच अल्लाट भजनामध्येही प्रामुख्याने वापरले जातात. परमेश्वराला अखंडितपणे साद घातल्याप्रमाणे भावपूर्ण आणि तन्मयतेने चालणारी ही आळवणी तसेच त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सुसंगत हालचाली हेही ढोलकी भजनाचे वैशिष्ट्या मानले जाते.

Advertisement

अशा या अल्लाट ढोलकी भजनामध्ये ढोलकीपटू महादेव रामचंद्र पालयेकर वयाच्या 75 वर्षापर्यंत समरसून वावरत होते. ढोलकीवादनात पारंगत असलेल्या महादेव पालयेकरांनी ढोलकी भजनासाठी उपयुक्त अशी विविधांगी वादनपद्धती आणि निरनिराळ्या गती अवगत केल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या जोडीला स्व. शंकर पालयेकर यांनीही त्यांना गायकीची चांगली साथ करून या कलेला एका उंचीवर नेले होते. महादेव पालयेकर यांनी आपले आजोबा गणेश (गणू) यांच्याकडे दहाव्या वर्षापासून ढोलकीवादनाचे शिक्षण घेतले होते. या प्रकाराला रसिकमान्यता मिळवून देण्यासाठी ते वावरले. 2004 मध्ये महादेव पालयेकर यांचे निधन झाले.

गोवा कला अकादमीने या पथकाचे ढोलकीवादनाचे कितीतरी कार्यक्रम घडवून आणले आहेत. कला व संस्कृती खात्यातर्फेही विविध विद्यालयात या भजनीप्रकाराबद्दल कार्यशाळाही भरविण्यात आल्या होत्या. त्यावेळी महादेव पालयेकर यांनी ढोलकीचे तर नकुळ परब यांनी गायनाचे मागर्दशन केले होते.

पारंपरिक भजनापेक्षा वेगळा असलेला तरीही आकर्षक आणि प्रभावी असा प्रकार मनोहारी भजनपूर्व काळात अत्यंत लोकप्रिय होता, असे सांगण्यात येते. दिंडीसारखा भासणारा आणि वारकरी भजनाप्रमाणे सादर करण्यात येणारा हा प्रकार गोव्यातील देवभूमीत विविध उत्सवानिमित्त सादर होतो. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही प्रकारांचा अल्लाट भजनात समावेश असल्यामुळे ते परिपूर्ण संगीत आहे, असे म्हणावे लागेल. श्री राष्ट्रोळी अल्लाट भजनी मंडळ या नावाने हे पथक  स्थापन झाले असून सध्या या भजनीप्रकाराचे विविध ठिकाणी सादरीकरण करत आहे.

गोव्यात होणाऱ्या सार्वजनिक, घरगुती गणेशोत्सवात तसेच सार्वजनिक  ठिकाणी यांचे कार्यक्रम आजपर्यंत घडवून आणण्यात आले आहेत. लोकोत्सव तसेच साहित्यिक दिंडीतही या अल्लाट ढोलकीवादनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

या कलेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नुकतेच कला अकादमीचे माजी सदस्य सचिव, लोककला अभ्यासक केंद्रसरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले तसेच गोवा सरकारचा गोमंतक विभूषण पुरस्कार प्राप्त केलेले विनायक खेडेकर यांनी या वाड्याला भेट दिली. विनायक खेडेकर तसेच डॉ. पांडुरंग फळदेसाई यांच्याकडे कला अकादमीचा ताबा असताना या भजनी पथकाला निमंत्रण देऊन अनेकवेळा या भजनी प्रकाराची रसिकांना पर्वणी मिळवून दिली होती. गोव्याच्या भजन संस्कृतीवर आपला अभ्यास सुरू असून या भजनीकलेचा योग्य तो प्रसार करण्याचे अभिवचन विनायक खेडेकर यांनी या कलाकारांना दिले. वयाच्या 85 व्या वर्षीही कलाक्षेत्रात झोकून देण्याची त्यांची वृत्ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. यावेळी या श्री राष्ट्रोळी अल्लाट ढोलकी भजनी मंडळाचे काही कलाकार दयानंद परब, अर्जुन परब, प्रशांत पालयेकर, वासुदेव पालयेकर, दिगंबर परब, वासुदेव परब यांनी या भजनी प्रकाराची झलक दाखवून दिली.

ही कला आजोबा, पणजोबापासून सुरू असल्याचे ढोलकीपटू महादेव पालयेकर यांचे पुतणे प्रशांत पांडुरंग पालयेकर यांनी सांगितले. दरवर्षी पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त प्रशांत पालयेकर हे पायी वारी करतात. त्यावेळी या भजनी प्रकारातील अभंग तसेच गजर सादर करतात. त्यावेळी वारीत सहभागी होणारे अन्य वारकरीही यात सहभागी होऊन या भजनात दंग

होतात.

सध्या हा भजनीप्रकार गणेशचतुर्थी, श्रावणमास तसेच साहित्य दिंडी कार्यक्रमात सादर केला जातो. संपूर्ण गोव्यात आगळ्यावेगळे फेर धरून पावले मारून गायिल्या जाणाऱ्या या अल्लाट भजनी प्रकाराचा प्रसार, प्रचार होणे अत्यावश्यक ठरते. ही कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य ते प्रयत्न सरकार पातळीवरून व्हायला हवेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने गोमंतकीय संस्कृती टिकणार आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :

.