अलाहाबादियाने केली क्षमायाचना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमात अश्लील प्रश्न विचारल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर रणवीर अलाहाबादिया याने स्वत:च्या त्या वर्तनासंबंधी राष्ट्रीय महिला आयोगाकडे क्षमायाचना केली आहे. ही माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख विद्या किशोर राहटकर यांनी दिली आहे. गुरुवारी रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मुखर्जीया या दोघांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर आपली उपस्थिती दर्शविली. त्यानंतर शुक्रवारी दोघांनीही आपली क्षमायाचना पत्रे आयोगाला सोपविली. जे झाले आहे, ते पुसता येणार नाही. मात्र, त्यासाठी आम्ही क्षमायाचना करीत आहोत. यापुढे असे घडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी क्षमायाचना पत्रात स्पष्ट केले आहे. अपूर्वा मुखर्जीया ही या कार्यक्रमात अलाहाबादिया याची सहकारी होती.
राहटकर यांचे वक्तव्य
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख राहटकर यांनी अलाहाबादिया यांचे विधान अस्वीकारार्ह असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. कार्यक्रमांमध्ये अशी विधाने करु नयेत. या कार्यक्रमासंबंधी माहिती मिळताच महिला आयोगाने स्वत:हून पुढाकार घेऊन अलाहाबादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांना नोटीसा पाठवून आयोगासमोर उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी कृती केली आहे. आता आयोगाचे सर्व सदस्य पुढचा निर्णय घेतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकरण काय आहे ?
काही आठवड्यांपूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या एका सोशल मिडिया कार्यक्रमातील ही घटना आहे. हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना अलाहाबादिया हा प्रश्न विचारीत होता. एका स्पर्धकाला त्याने अत्यंत अश्लील आणि ओंगळवाणा प्रश्न विचारला. त्यामुळे त्याला सोशलमिडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्याच्या या प्रश्नामुळे मोठी वादग्रस्तता निर्माण झाली होती. त्याच्या आणि या कार्यक्रमाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आल्या. त्यामुळे त्याला आणि त्याच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे सादर करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्याची कठोर शब्दांमध्ये कानउघाडणी केली होती. मात्र त्याला अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच ज्या कार्यक्रमात हा प्रकार घडला त्या कार्यक्रमावर अंतरिम स्थगितीही देण्यात आली होती. मात्र, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवून कार्यक्रम पुन्हा दाखविण्यास प्रारंभ करण्याची अनुमती दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेऊन कारवाई केली आहे.